
Sharad Pawar on NCP Reunion: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. कालच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे वर्षावर पोहचले होते. त्यांनी सव्वातास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. दरम्यान आज सकाळी पत्रकार परिषद घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या विषयावर मोठे भाष्य केले. त्यांनी गौप्यस्फोटही केले. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, यावर त्यांनी स्पष्ट मत मांडले.
राष्ट्रवादीतील घडामोडींविषयी कानावर हात
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीविषयी आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. हा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्याला याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे वा त्यांच्या पक्षाकडून कोणतीही माहिती आली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आज सकाळी आपल्याला हा विषय समजल्याचे ते म्हणाले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईतील राजकीय घडामोडींविषयी अलिप्त असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी एकत्रिकरणावर मोठे भाष्य
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. महापालिका निवडणुकीनंतर हा निर्णय घेण्यात येणार होता. पण जिल्हा परिषद निवडणूक लागल्या. या निवडणुकीत एकाच चिन्हावर, घड्याळावर दोन्ही राष्ट्रवादीने लढावे अशी दादांची इच्छा होती. गेल्या दोन दिवसांपासून याविषयीच्या बातम्या आल्या. त्याला दोन्ही राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी सुद्धा दुजोरा दिला. अशा चर्चा सुरू होत्या असे त्यांनी सांगितले.
दरम्यान आज सकाळी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी विचारले असता शरद पवार यांनी त्यावर मोठं भाष्य केलं. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अजितदादादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो असे पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. तर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत खंड पडल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असे मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केले. दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता याविषयीचा निर्णय दोन्ही बाजूचे नेते करतील असे त्यांनी स्पष्ट केले.