आज दिवसभर बड्या घडामोडी… ओमराजे निंबाळकर कुणाची करणार कोंडी?…धाकधूक वाढली…
Omraje Nimbalkar-Uddhav Thackeray: पवनराजे खून खटल्यातील निकालाने ऑपरेशन टायगरचा फियास्को होतो की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे. मध्यरात्री पुण्यात मोठी खलबतं घडली. मातोश्रीचा निरोप पोहचताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर उद्धव ठाकरे यांना तो थेट संदेश पाठवला.

Kailas Patil- Varun Sardesai-Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खून खटल्यात मुंबई सत्र न्यायालयात सर्व आरोपी निर्दोष सुटले. हे कलयुग आहे, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. त्यानंतर ऑपरेशन टायगरचा फियास्को होतो की काय या चर्चांनी जोर धरला आहे. वातावरण तापलेले असतानाच मातोश्रीवरून निंबाळकर यांच्यासाठी निरोप पाठवण्यात आला. त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यांचे खास मित्र आणि ‘ओके’ मंडळातील दुसरे पक्के सदस्य कैलास पाटील आणि आमदार वरूण सरदेसाई यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी थेट संदेश पाठवला. आज दिवसभर मोठ्या घडामोडी घडणार असून सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.
मध्यरात्री पुण्यात मोठी खलबतं
आमदार कैलास पाटील, आमदार वरूण सरदेसाई यांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत मध्यरात्री तब्बल एक तास बैठक झाली. मध्यरात्री बाणेर येथील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक झाली. मातोश्रीचा निरोप घेऊन आमदार कैलास पाटील व आमदार वरूण सरदेसाई हे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला पोहचले. खासदार ओमराजे निंबाळकर आमच्या पक्षात रहावे यासाठी आमची मन धरणी सुरूच राहणार असे आमदार कैलास पाटील म्हणाले.
वरुण सरदेसाई म्हणाले काय?
आमदार वरुण सरदेसाई यांनी यानंतर खास प्रतिक्रिया दिली. ओम दादा यांच्याबाबत लागलेला निर्णय अपेक्षित नव्हता. पक्ष सचिव म्हणून भेटलो. काही गोष्टींची चर्चा आम्ही केली. सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर बोलणें योग्य नाही. आजही ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार म्हणून निवडून आले आहेत. पहिली निवडणूक लढवून ते आमदार झाले, तीन वेळा खासदार झाले. निकाल लागल्यानंतर त्यांच्या परिवार यांना धक्का लागला आहे त्यावर चर्चा केली. ज्या ज्या विषयावर चर्चा झाली ती तुमच्यासमोर करायची असती तर उघडपणे भेटलो असतो ना? असे वरूण सरदेसाई म्हणाले.
आज ओमराजे निंबाळकर निर्णय घेणार
आमदार कैलास पाटील यांनी या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. आम्ही प्रयत्न करतोय आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत. २० वर्ष ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला त्यांना न्याय मिळाला नाही. पक्ष प्रमुख यांचा निरोप आम्ही त्यांच्याकडे घेऊन आलो आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति जी भावना आहे ती आजही कायम आहे, ते पक्षात कायम राहतील असा आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप आम्ही ओमराजे निंबाळकर यांना दिला. त्यानुसार एक दिवस द्या असे ते म्हणाले. त्यामुळे आज ओमराजे निंबाळकर हे मतदारसंघात जाऊन त्यांचा निर्णय जाहीर करतील असे वाटते.
ओमराजे निंबाळकर यांची आजही मनधरणी
आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी खासदार ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करणार आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज गोवर्धनवाडी येथे बोलावलेल्या शिवसैनिकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी हे बैठकीला उपस्थित राहून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
संभाव्य पक्षांतराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, निष्ठावान शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय भूमिका निश्चित करण्याचा ओमराजे यांचा निर्णय होईल. कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी हे बैठकीत नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
