Sushma Andhare : राज्यपाल संवेदनशून्य, फडणवीसांनी मलमपट्टी करू नये, वादग्रस्त वक्तव्यावरून सुषमा अंधारेंचा कोश्यारींवर हल्लाबोल

राज्यपाल संवेदनशून्य असून त्यांनी राज्याची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी करत देवेंद्र फडणवीस यांनी मलमपट्टी करू नये, असे खडे बोलदेखील सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सुनावले आहेत.

Sushma Andhare : राज्यपाल संवेदनशून्य, फडणवीसांनी मलमपट्टी करू नये, वादग्रस्त वक्तव्यावरून सुषमा अंधारेंचा कोश्यारींवर हल्लाबोल
सुषमा अंधारे
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 30, 2022 | 4:16 PM

पुणे : राज्यपाल (Governor) हे घटनात्मक पद आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलताना असे विधान करताना काळजी घेतली पाहिजे. मुळात राज्यपाल हे पद पक्षविरहित असून राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. या पदावर बसून असे विधान करणे म्हणजे त्या पदाचा अवमान असल्याची टीका, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर केली आहे. राज्यात एवढे राजकारण सुरू असताना सुद्धा बाळासाहेबांचे सो कॉल्ड वारसदार यांनी त्यांच्या तथाकथित महाशक्तीला विनंती करून तुमच्या राज्यपालांचा राजीनामा घेऊन त्यांना तातडीने परत बोलवा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. तसेच हे राज्यपाल संवेदनशून्य असून त्यांनी राज्याची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी करत देवेंद्र फडणवीस यांनी मलमपट्टी करू नये, असे खडे बोलदेखील सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सुनावले आहेत.

फडणवीसांकडून मलमपट्टी

एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेकवेळा अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो. त्याप्रमाणे राज्यपाल बोलले आहेत. मला विश्वास आहे, की त्यांच्याही मनात मराठी माणसांबद्दल श्रद्धा आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग मोठा आहे, याची त्यांना जाणीव असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी करत राज्यपालांचे अप्रत्यक्ष समर्थन केले आहे. राज्यपाल काय बोलले, याबद्दल आम्ही काहीही बोलणार नाही, त्याचा खुलासा राज्यपालच करतील, असेही फडणवीस म्हणाले.

राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी म्हणाले, की महाराष्ट्रातून विशेषत: मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसा उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही. मराठी माणसांना कमी लेखत गुजराती आणि राजस्थानी समाजामुळे मुंबईत पैसा असल्याचे कोश्यारी म्हणाले होते. आता त्यांच्या या वादग्रस्त आणि महाराष्ट्रासाठी अपमानजनक वक्तव्याचा निषेध होत असून सुषमा अंधारे यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांनी सारवासारव करत मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान असल्याचे म्हटले आहे.