Raj Thackeray | ‘डीजेचा नातवाला त्रास झाला, म्हणून लगेच चर्चा’, राज ठाकरेंवर महिला नेत्याचा निशाणा

Raj Thackeray | राज ठाकरे यांनी त्यांच्या X वरील पोस्टमध्ये काय लिहिलेलं?. दुपारी उठून कस चालेल अशी खोचक टिका सुद्धा या महिला नेत्याने केली. राज ठाकरे यांनी डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर बोट ठेवलय.

Raj Thackeray | डीजेचा नातवाला त्रास झाला, म्हणून लगेच चर्चा, राज ठाकरेंवर महिला नेत्याचा निशाणा
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2023 | 1:17 PM

मुंबई (प्रदीप कापसे) : नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात गणेशोत्सव पार पडला. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरवणुकांमधील डीजे,डॉल्बीच्या दणदणाटावर बोट ठेवलं. त्यांनी X वर एक पोस्ट लिहून गणेशोत्सव मिरवणुकीतील डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर भाष्य केलं. डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टिममुळे काय दुष्परिणाम होतात, त्याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. “डीजे,डॉल्बी ह्यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं, किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात पण पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग २४,२४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का ?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

“एका बाजूला कौटुंबिक गणेशोत्सवात तो पर्यावरण पूरक असेल, थर्माकोलचा वापर टाळत, कृत्रिम तलावात विसर्जन करत, आपल्या आनंदामुळे निसर्गाची किंवा इतर कोणाची हानी होऊ नये हे पाहण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. आणि दुसरीकडे जेंव्हा त्याचं सार्वजनिक स्वरूप येतं तेंव्हा त्यातल्या वर उल्लेखलेल्या त्रुटी दुर्लक्षित करता येत नाहीत. ह्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, सरकारने, समाजातील विचारवंतांनी आणि अर्थात गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन ह्याला काहीसं बीभत्स स्वरूप येतंय ते वेळीच थांबवलं पाहिजे” असं राज ठाकरे म्हणाले. “मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्यावर विचार आणि कृती करायला हवी” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

दुपारी उठून कस चालेल?

ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी आता याच मुद्यावरुन नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय. “एका मोठ्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली. त्याच्या डीजेचा नातवाला त्रास झाला म्हणून लगेच चर्चा. मात्र अनेक वर्ष लेझरमुळे अनेक जणांची दृष्टी जाते तेव्हा काय होतं? नेत्यांच्या नातवाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मात्र सर्वसामान्यांची मुलही चांगली राहिली पाहिजेत” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलय, दुपारी उठून कस चालेल अशी खोचक टिका सुद्धा त्यांनी केली.