Pune Anurag Thakur : आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी सर्व देश एकत्र आले याचा आनंद; अनुराग ठाकूर यांचं पुण्यात वक्तव्य

अनुराग ठाकूर म्हणाले, की 21 जून हा योग दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रस्ताव ठेवला, की 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा. त्याला इतर देशांनीही सहकार्य केले.

Pune Anurag Thakur : आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी सर्व देश एकत्र आले याचा आनंद; अनुराग ठाकूर यांचं पुण्यात वक्तव्य
पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना अनुराग ठाकूर
Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: May 28, 2022 | 4:44 PM

पुणे : गेल्या 8 वर्षांत योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. ट्रेन आणि फ्लाइटमध्ये मी लोकांना योगाभ्यास करताना पाहतो. विमानतळांवर योगासाठी विशेष कक्ष बनवले जात आहेत. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यासाठी म्हणून सर्व देश एकत्र आले याचा मला आनंद आहे, असे वक्तव्य केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पै. खाशाबा जाधवांच्या नावाने उभारलेल्या क्रीडा संकुलाचे आज उद्घाटन झाले. तसेच पै. खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचेही अनावरण झाले. त्या कार्यक्रमात अनुराग ठाकूर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अजित पवार यांच्यासह मान्यवर आणि नेते उपस्थित होते.

‘खेळामध्ये राजकारण व्हायला नको’

या कार्यक्रमाची सुरुवात ही योगाने झाली. अनुराग ठाकूर म्हणाले, की 21 जून हा योग दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रस्ताव ठेवला, की 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा. त्याला इतर देशांनीही सहकार्य केले. आठ वर्षात बदलाला सुरुवात झाली आहे, असे ते म्हणाले. खेळामध्ये राजकारण व्हायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्याला भारताला पदके जिंकण्यासाठी पुढे जायचे आहे. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे योगदान महत्त्वाचे आहे. हरयाणा, पंजाब येथून सगळ्यात जास्त भारताला पदके येतात.

‘खेलो इंडियासाठी बजेट वाढवले’

महाराष्ट्र सरकारनेही आयोजन केले तर खेलो इंडिया करायला आम्ही तयार आहोत. जे जे सहकार्य लागेल ते आम्ही करू. खेळ हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे राज्याने यामध्ये रुची घेतली पाहिजे. मोदींना मी विनंती केली आहे, की खेळासाठी बजेट वाढवा. खेलो इंडियासाठी यंदा बजेट वाढवण्यात आले आहे. 3 हजार 62 कोटी रुपये निधी खेळासाठी आता देण्यात येत आहे. मला विश्वास आहे, राज्य सरकार यासाठी निधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.