पुण्यात मोठ्या घडामोडी, वसंत मोरे शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल

| Updated on: Mar 14, 2024 | 4:41 PM

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे ते आज शरद पवार गटात प्रवेश करतात का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

पुण्यात मोठ्या घडामोडी, वसंत मोरे शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल
Follow us on

पुणे | 14 मार्च 2024 : मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे ते आज शरद पवार गटात प्रवेश करतात का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. वसंत मोरे शरद पवारांच्या कार्यालयात दाखल झाले तेव्हा वसंत मोरे यांना पत्रकारांनी आज शरद पवार गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं नाही. आपण फक्त शरद पवार यांना भेटायला आलो असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. पण तरीसुद्धा राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या कार्यालयात हालचाली वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आज आमदार निलेश लंके यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

“माझा पक्षप्रवेश नाही. मी खासदार अमोल कोल्हे आणि शरद पवार यांना भेटायला आलो आहे. मी लपवणार नाही. आता निवडणुका आहेत. मी निवडणूक लढवू इच्छूक आहे. शरद पवारांनी बोलावलं म्हणून मी आलो. माझा आज पक्षप्रवेश नाही. निवडणुका लागू द्या. अजून निवडणूक लागलेली नाही. आता पुण्याचं मैदान मारायचं आहे म्हणून आलेलो आहे. पण अजून त्याबाबतीत कोणतीही चर्चा नाही. मी अमोल कोल्हे यांच्या लोकसभा मतदारसंघात राहतो. आमची मैत्री आजची नाही. अनेक वर्षांची आहे”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

‘मला फक्त भेटण्यासाठी बोलावलंय’

“अमोल कोल्हे यांच्यासोबत मतदासंघाबाबत चर्चा झाली. मी त्यांच्या मतदारसंघात राहतो. मी आता बोलून काहीच उपयोग नाही. मी फक्त शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहे. मी अजून काहीच सांगू शकत नाही. मला फक्त भेटण्यासाठी बोलावलं आहे. माझ्याकडे जे विषय आहेत, ते मी शरद पवार यांना दाखवण्यासाठी आलो आहे. ते विषय दाखवल्यानंतर मी जाताना सविस्तर सांगेल. शरद पवार गटाच्या कार्यालयात आलोय. कार्यालयात माणूस भेटण्यासाठीदेखील येतो”, असं वसंत मोरे म्हणाले.

दरम्यान, वसंत मोरे हे पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठीच त्यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आपण पुढच्या दोन-तीन दिवसात भूमिका मांडू, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर ते आज शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.