Vidyanand Bapat: DJ ला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांची मशिदींवरील भोंग्यावर मोठी प्रतिक्रिया, म्हणाले एकाने गाय मारली म्हणून…
Vidyanand Bapat on Mosque Speaker: गणेशोत्सवात डीजे वाजवण्याला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांची सोशल मीडियावर क्रेझ आहे. आता त्यांना पु्ण्यात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचवेळी मशिदींवरील भोंग्यावरील त्यांची मोठी प्रतिक्रियाही समोर आली आहे.

पुण्यातील गणेशोत्सवातच नाही तर राज्यातील बाप्प्पाच्या आगमण आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या गोंगाटाचा भाविकांना मोठा त्रास होतो. त्याविरोधात समाजातून मोठी नाराजी दिसून येत आहे. नेमक्या या असंतोषाला पुण्यातील विद्यानंद बापट यांनी वाट मोकळी करून दिली. गणेशोत्सवातील DJ आणि गोंगाटाला त्यांनी तार्किक आणि समर्पक उत्तरं दिल्याने अनेकांना त्यांचे मुद्दे खोडून काढणे अवघड झाले आहे. त्यामुळेच त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना मशिदीवरील भोंग्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.
मशिदींवरील भोंग्याबाबत बापट म्हणाले काय?
विद्यानंद बापट यांच्या अनेक जण मुलाखती घेत आहेत. अनेक वाहिन्या, ब्लॉगर्स, युट्यबर्स त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांची बाजू ऐकून घेत आहेत. डीजे विरोधात आणि कानठळ्या बसवणाऱ्या स्पीकरविरोधात दणकेबाज भूमिका घेणाऱ्या बापट यांना मशिदींवरील भोंग्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाचे उत्तर दिले. मुळात एक लॉजिकल फॅलसी आहे. मराठीत एक म्हण आहे. एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारणं योग्य नाही. म्हणजे काय तर टीकेला टीकेने उत्तर देणे. एकाने एक चुकीची कृती केली म्हणून दुसऱ्यानं चुकीचं वागणं. त्यामुळे तुम्ही करत आहात ते योग्य कसं ठरतं? असा उलट सवाल बापट यांनी केला.
तू खून केला तर त्याने केलेला खून कसा काय योग्य ठरतो? एक चूक दाखवून दुसरी चूक न्यायोचित ठरवता येत नाही. मशिदींवरील भोग्यांवर आक्षेप नाही असं नाहीच. या मुद्यावर न्यायपालिकेत अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ही त्यावर निवाडा दिला आहे. मशिदींवरीलच नाही तर सगळ्याच धार्मिक स्थळांवरील भोंग्यावर बंदी आहे. मुस्लिम समाजाने मस्जिद अजान या नावाने ॲपही तयार केले आहे. त्याचा वापर ही होतो. त्यामुळे मशिदींवरील भोंगे आणि मी मांडत असलेल्या भूमिकेवरून जी टीका होते, त्याचे मी खंडन केले आहे, असं बापट यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत भूमिका स्पष्ट केली आहे.
ध्वनी प्रदूषण नकोच
कुठल्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण नको अशी भूमिका बापट यांनी जाहीर केली. डीजे नको, फटाके नकोत. ढोल-ताशेही नको. अथवा धार्मिक स्थळावरील भोग्यांविषयीही त्यांनी न्यायापालिकेच्या भूमिकेच्या अंगाने बाजू मांडली. दोन वर्षांपूर्वी कोर्टाने आदेश दिल्यानंतर गणेशोत्सवातही ध्वनी प्रदूषण मोजायला लागले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. विद्यानंद बापट जी भूमिका मांडत आहेत, त्यावरून काहीचं पित्त खवळलं आहे. त्यांना मुद्देसुद उत्तर देण्याऐवजी ते हातघाई करत असल्याचे मारहाणीच्या घटनेवरून त्यांना पाठिंबा देणारे म्हणत आहेत.
