फुक्कट नांदवायची काय? मारून टाकले तुझ्या पोरीला… वैष्णवीच्या मृत्यूनंतर रुग्णालयात काय घडलं?; एफआयआरमध्ये नेमकं काय?
राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. आमच्या वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान एफआयआरमधून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वैष्णवीचे वडील आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी या प्रकरणात खळबळजनक आरोप केले आहेत. माझी मुलगी वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्यामध्ये प्रेमसबंध असल्याची माहिती मला मिळाली होती, त्यामुळे मी त्याचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.मी माझ्या मुलीला हुंड्यामध्ये 51 तोळे सोनं, फॉरच्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिली, मात्र त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून तिचा छळ सुरू झाला, तिचा पती शशांक आणि तिचे सासू -सारे शुल्लक कारणांवरून तिचा छळ करू लागले, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी एफआयआरमध्ये केला आहे.
वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षाच्या मुलीने पैशाच्या मागण्यांमुळे आणि सासरच्या जचाला कंटाळून आत्महत्या केली? ह्या जमान्यात?
अंगावर इतक्या जखमा ?
पैशासाठी एका मुलीचे इतके हाल ? इतकी मारहाण ?
FIR वाचून हादरले. खूप ह्या कुटुंबाची कसून चौकशी झाली पाहिजे. pic.twitter.com/V3vALKybRB
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 21, 2025
16 मे रोजी माझे दाजी उत्तम बहिरट यांचा मुलगा प्रणव बहिरट याच्या मोबाईलवर शशांक हगवणेचा फोन आला, माझे आणि वैष्णवीचे भांडण झाले आहे, तिच्या बापाला तिला घरी घेऊन जाण्यासाठी सांग असं त्याने प्रणवला सांगितलं, त्यानंतर प्रणवने दोन तीन वेळा शशांकला फोन करून भांडणाचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने प्रणवचा फोन उचलला नाही, त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास शशांकने प्रणवला फोन करून सांगितले की, वैष्णवीने गळफास घेतला असून, तुम्ही सर्वजण चेलाराम हॉस्पीटल बावधन येथे या, तिथे माझी मुलगी वैष्णवी बेशुद्ध अवस्थेमध्ये बेडवर पडलेली दिसली, आम्ही तिच्या तब्येतीबाबत डॉक्टरांना विचारपूस केली असता, डॉक्टरांनी सांगितलं की, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे.
तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या, याबाबत आम्ही शशांक आणि त्याच्या वडिलांकडे विचारणा केली असता ‘तुला आधीच सांगितले होते की, आम्हाला पैसे पाहिजेत, तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायची काय, म्हणून मारून टाकले तुझ्या पोरीला” असं त्यांनी यावेळी मला सांगितलं हे ऐकूण माझ्या पायाखालची वाळूच सरकली असं वैष्णवीच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.