
अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्र असलेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ६ वेळा आमदार राहिलेले शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या २३ एप्रिल रोजी राहुरीत मतदान पार पडणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी होईल. या घोषणेमुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले हे या निवडणुकीसाठी भाजपकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही ते या मतदारसंघातून सक्रिय होते. विशेष म्हणजे, त्यांचे मेहुणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी अक्षय कर्डिले यांच्यासाठी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. कर्डिले साहेब हे ६ वेळा आमदार होते, जनतेचा आशीर्वाद अक्षयच्या पाठीशी आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न असेल, पण निवडणूक झाली तरी विजय आमचाच असेल, असा ठाम विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत किंगमेकर ठरू शकते. तनपुरे हे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर कौतुक केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार, असे त्यांनी म्हटल्याने या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. मात्र ते भाजपच्या वाटेवर आहेत की स्वतंत्र भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुरीच्या राजकारणात तनपुरे फॅक्टरचा नेहमीच प्रभावी राहिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आणि त्यांच्या प्रती असलेली सहानुभूती पाहता, महायुती ही जागा भावनिक मुद्द्यावर बिनविरोध काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढू, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
दरम्यान बारामती आणि राहुरी या दोन्ही हाय-प्रोफाईल जागांवर एकाच वेळी मतदान होणार असल्याने राज्याचे राजकीय वातावरण तापणार आहे. येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी या दोन्ही मतदारसंघासाठी निवडणूक पार पडेल. त्यानतंर ४ मे २०२६ रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. ही निवडणूक विकासकामे, सहानुभूतीची लाट या मुद्द्यावर लढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.