
राज्यात यंदा मान्सून वेळेआधी आला. त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला होता. परंतु त्यानंतर सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झाला. यामुळे राज्यातील अनेक भागांत पेरण्यांना वेग आला आहे. आता जूनच्या शेवटीही पावसाचा जोर कायम असणार आहे. २८ जून ते १ जुलै दरम्यान राज्यातील बहुतांशी भागांत पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम असणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक भागाच्या पश्चिम भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 28 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. बीड, परभणी आणि लातूरमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.
मुंबईत शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. परंतु हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे शहरातही शुक्रवारपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. शनिवारी ढगाळ वातावरण होते. पुण्यात हलक्या स्वरुपाचा पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात लावणी योग्य पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील हिरडस मावाळ खोऱ्यात शेतकऱ्यांची भात लावणीला सुरुवात केली आहे. दमदार पावसाने भात खाचरातून पाणी साचू लागले. यामुळे शेतकऱ्यांची खाचरात चिखलणी करून भात लावणी सुरु केली आहे.
Heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in the ghat areas of Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. " pic.twitter.com/teBUL94PeX
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 27, 2025
विदर्भ आणि मध्य प्रदेशात चांगला पाऊस सुरु आहे. यामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. जळगावमधील भुसावळच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे 50 मीटरने उघडले. धरणातून दहा हजार 171 क्युसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांत वेगाने आवक सुरू झाली आहे.