नाशिक दत्तक घेतो म्हणाले… नंतर बाप फिरकलाच नाही, राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Raj Thackeray : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून आज नाशिकमध्ये प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या सभेत बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

नाशिक दत्तक घेतो म्हणाले... नंतर बाप फिरकलाच नाही, राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
Raj Thackeray and Fadnavis
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 09, 2026 | 8:29 PM

राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून आज नाशिकमध्ये प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या सभेत बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. नाशिक दत्तक घेतो म्हणाले… नंतर बाप फिरकलाच नाही असा हल्लाबोल राज ठाकरेंनी फडणवीसांवर केला आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

पैसे देऊन भाजपने लोक पक्षात घेतले – राज ठाकरे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नाशिकमध्येही भाजप तुमच्याकडे माणसं होती ना. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष जनसंघ नावाने त्याला 2026 ला पोरं भाड्याने घ्यावे लागतात. तुमची माणसं उभी केली होती ना. मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचत आहात. येणारे आनंदाने येत नाही. रात्री पैसे पोहोचवले जातात.

नाशिक मी दत्तक घेतो असं फडणवीस म्हणाले पण…

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी, ‘तपोवनातील झाडं महाजनांना हटवायचे आहेत. अहो लाकूडतोड्या बरा होता. कुऱ्हाड गेली देवीने विचारलं सोन्याची तर नाही. चांदीची तर नाही. ओरिजनल दिली. सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीलाही लाकूडतोड्या भाळला नाही. यांना झाडं छाटायची आहे. स्वतच्या पक्षातील कार्यकर्ते छाटली. बाहेरून झाडं मागवली आणि ती पक्षात लावत आहेत. 2012 साली इथे सत्ता आली. 2017 साली इथे फडणवीस आले. म्हणाले, नाशिक मी दत्तक घेतो. त्या सर्व गोष्टींना नाशिककर भुलले. आम्ही जी कामे केली होती ते विसरले. दत्तक घेतो म्हटल्यावर बाप परत फिरकलाच नाही. काय काय करतो म्हणून सांगितलं होतं असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला आहे.

विकासकामांची लाट लावली

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘आमची सत्ता असताना कुंभमेळा झाला. उत्तम पार पडला. एकही झाड कापलं नाही. रतन टाटांना आम्ही नाशिकमध्ये आणलं. पहिल्या पाच वर्षात आम्ही धरणातून पाईपलाईन आणली. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न सोडवून टाकला. जीपीएस लावलेल्या घंटा गाड्या सुरू केल्या. घनकचरा प्रकल्प सुरू केला. विटा खत शेतकरी घेऊन जात आहेत. तिथे वासही येत नाही. वाहतूक बेटांचं सुशोभिकरण केलं. बोटॅनिकल गार्डन केलं. मी रतन टाटांकडे प्रकल्प घेऊन गेलो. ते म्हणाले किती खर्च आहे. मी म्हटलं पाच कोटी. ते म्हणाले डन आणि त्यांनी त्यांचे माणसं कामाला लावली. त्यांचीच माणसं प्रकल्प केली. तो प्रकल्प झाला तेव्हा रतन टाटांनी 15 कोटी खर्च केले होते. या गार्डनची गेल्या पाच वर्षात वाट लावली आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला आहे.