Marathi News Maharashtra Raj thackeray facebook post after shivsena ubt and mns alliance announcement
भावासोबत युती होताच राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्टने उडवून दिली खळबळ, दिले मोठे संकेत; काहीतरी मोठं घडणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे.
MNS UBT Alliance : मुंबई तसेच इतर महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीसाठी आज (24 डिसेंबर 2025) उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे पक्षाच्या युतीची घोषणा झाली. या ऐतिहासिक क्षणाची गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र वाट पाहात होता. अनेकांची ही इच्छा पूर्ण झाली असून ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली आणि युतीची थेट घोषणा केली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी जागावाटपावर कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, आता या युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जागावाटपाचा मुद्दा तसे मुंबई महापालिकेची निवडणूक यावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. त्यांनी एका प्रकारे मनसे आणि ठाकरे गटाच्या आगामी राजकारणाची दिशा सांगितली आहे.
राज ठाकरे यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे?
“आज २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती. आणि या सगळ्याची सुरुवात, मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली,” असे राज ठाकरे आपल्या पोस्टेमध्ये म्हणाले आहेत.
ते फक्त मुलाखतीतलं वाक्य नाही तर…
तसेच, कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे.’ हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे, असे सांगत युतीची घोषणा झाली आहे. आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील, असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
आजच्या व्यासपीठावर कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत.
युती ही किती जागा, कुठल्या जागा यासाठी नाहीये. ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती केल्याचेही राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले आहे.
जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील, असे सांगून मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल, असे जाहीरपणे राज ठाकरे यांनी सांगून टाकले आहे. पुढे बोलताना आज वर्तमानपत्रं असोत किंवा वृत्तवाहिन्या, त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवट मराठी प्रेमी आहेत. आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरु आहे ते आवडत नाहीये. त्यातले अनेक जणं त्यांचा रोष त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्त करतात, तर काही खाजगीत व्यक्त होतात.
माझी सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटतं, पटतं तेच मांडा, बोला. ही दोन पक्षांची लढाई नाही तर ही मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं यावेळेस तुम्ही उभे रहा. कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला तर तुमचं अस्तित्व टिकेल, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.