उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या युतीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टीका केली आहे. 'दोन शून्य एकत्र आले तरी बेरीज शून्यच राहते' अशा शब्दात त्यांनी या युतीचा समाचार घेतला.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. या युतीच्या घोषणेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत टोकदार आणि खोचक शब्दात टीका केली. राजकारणात जेव्हा दोन शून्य एकत्र येतात, तेव्हा त्यांची बेरीजही शून्यच राहते. मुंबईकरांना आता शहर गाजवणारे नको, तर प्रामाणिकपणे सेवा करणारे सेवेकरी हवेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी युतीवर टीका केली.
काही फार परिणाम होईल असं वाटत नाही
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, याचा मला आनंद आहे. पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काहीतरी घडेल असा जर कुणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. माझ्यासमोर टीव्ही सुरु होता म्हणून बघत होतो. काही माध्यमं असं दाखवत होती रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. झेलेन्स्की निघाले, पुतिन निघाले आणि युती झाली. मला वाटतं कुठल्याही पक्षाला अस्तित्व टिकवण्यासाठी जे करायचं असतं ते त्यांनी केलं. याने काही फार परिणाम होईल असं वाटत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कारण मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे. मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलं आहे. त्यामुळे मराठी माणूस त्यांच्या बरोबर नाही. तर ज्यांच्यावर यांनी हल्ले केले असे अमराठीही यांच्याबरोबर नाहीत. मुंबईत कुणीही यांच्या सोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचार आणि स्वहिताचा आहे. आता जनता भावनिक बोलण्याचा विचार करत नाही. मुंबईकर महायुतीचं काम बघून, मुंबईचा विकास बघून मतं देतील. विशेषतः मराठी माणसाला मुंबईत घरं देण्याचा कार्यक्रम महायुतीने सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईकर महायुतीच्या पाठिशी उभे राहतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट बदलली पाहिजे
आकड्यांशी माझा काही संबंध नाही, त्यांच्या मनात काय आकडे आहेत? ते कुठे आकडे लावत आहेत? मला माहीत नाही त्यात मला रसही नाही. ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली. जो हाईप तयार केला होता खोदा पहाड और चुहाँ भी नहीं निकला. त्यांनी लक्षात ठेवावं ते म्हणजे मुंबई नाहीत, ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे सगळं काही असा जो त्यांचा गर्व आहे. त्यामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेलेत. मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट बदलली पाहिजे. अनेक वर्षे एकच गोष्ट बोलत आहेत. त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागेल पण ते बोलणार नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यासोबतच त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती म्हणजे भीती संगम आहे हा प्रीतम संगम नाही. शिवाय व्हिडीओ काहीही बनवूदेत. अख्ख्या जगाला माहीत आहे देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी झाला. हिंदुत्वातच जगतो आहे आणि हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाही. असा टोला राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
