इतिहासाचं वेड लागलेलीच माणसं..; इतिहास संशोधक गजानन मेहेंदळेंच्या निधनानंतर राज ठाकरेंकडून भावना व्यक्त
गजानन मेहेंदळे यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्रजीत लिहिलेली ग्रंथे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. बुधवारी संध्याकाळी खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेहेंदळेंच्या निधनानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्रासारख्या प्रांतात जिथे आपण कोण होतो आणि आपल्या क्षमता काय आहेत याचं भानच जिथे हरवत चाललं आहे. अशा वेळेला गजानन मेहेंदळेंसारकी माणसं आपल्यात नाहीत. ज्यांना पटकन एक संदर्भ विचारता येईल, ज्यांच्यामुळे एक दृष्टीकोन मिळेल अशी माणसं आसपास न दिसणं हे दुर्दैव असल्याची भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘शिवचरित्र’कार गजानन भास्कर मेहेंदळे यांचं बुधवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. मेहेंदळेंनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ इतिहास संशोधन कार्याला वाहून घेतलं होतं. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. गजानन मेहेंदळेंच्या निधनानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘गजाननरावांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवलं आणि अभ्यासाला सुरुवात करताच त्यांना युद्धशास्त्रात रुची निर्माण झाली. अठराव्या वर्षापासून त्यांनी युद्धशास्त्राचं वाचन आणि अभ्यास सुरू केला. पुढे 1971 च्या बांगलादेश युद्धाच्या वेळेस ते एका वर्तमानपत्रासाठी युद्ध पत्रकार म्हणून गेले, तेव्हा त्यांचं वय होतं अवघ्या 24 वर्षांचं. ग्रंथालयातील पुस्तकांमध्ये दिसणारा इतिहास आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर इतिहास घडताना पहायचं! आयुष्यात असे दोन्ही अनुभव किंवा मी तर म्हणेन भाग्यच गजाननरावांना लाभलं. युद्धाचं वार्तांकन करत असताना वास्तव जे डोळ्यांना दिसतं आणि बाहेर जे प्रसारित केलं जातं, यात किती तफावत असतं आणि अनेकदा बाहेर जे पसरवलं जातं तोच पुढे इतिहास होतो हे सगळं त्यांनी अनुभवलं असणार,’ असं त्यांनी लिहिलंय.
इतिहास संशोधकाकडे पूर्ण तटस्थता हवी, जी गजाननरावांकडे होती. पण तटस्थततेच्या नावाखाली खूपच स्वप्नाळूपणा किंवा कोणालातरी खलनायक ठरवायचं.. असले प्रकार गजाननरावांनी कधी केले नाहीत, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. याविषयी त्यांनी पुढे लिहिलं, ‘मध्यंतरी एक वाक्य वाचनात आलं, ते नक्की कुठे वाचलं ते नेमकं आता आठवत नाहीये पण वाक्य फार सुंदर आहे. Until the lions have their historians, tales of the hunt shall always glorify the hunter. इतिहास जेत्यांचा लिहिला जातो किंवा सांगितला जातो, पण पराजितांचं काय? त्यात पण समजून घेण्यासारखा इतिहास लपलेला असतो, असं भान असलेले इतिहास संशोधक जवळपास नाहीसेच होत चालले आहेत.’
राज ठाकरेंची पोस्ट-
‘गजाननराव इतिहास संशोधन करायचं म्हणून अनेक भाषा शिकले. मोडी , फार्सी , इंग्रजी भाषा शिकले. कारण आपला इतिहास किंवा डॉक्युमेंटेशन हे आपल्या लोकांनी फार न लिहिता इतर लोकांनीच जास्त लिहून ठेवल्यामुळे त्यांच्या भाषा शिकून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गजाननरावांनी कमालीचं केलं. सोशल मीडियाच्या काळात इतिहास संशोधक म्हणवणाऱ्यांचं आज पेवच फुटलं आहे. अनेक भाषा सोडा ज्या भाषेत त्यांचं म्हणणं मांडतात त्या भाषेत पण धड व्यक्त होता येत नाही, अशा काळात आपण जगत आहोत. व्हॅाट्सॲपर आलेलं काहीही खरं मानण्याच्या काळात पूर्ण आयुष्य एखाद्या विषयाच्या संशोधनाला द्यायचं हे संस्कार आता कसे होणार,’ असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी मेहेंदळेंच्या भेटीचे किस्सेदेखील सांगितले आहेत. ‘माझं भाग्य आहे असं मी म्हणेन की मला लहान वयातच इतिहासाची गोडी लागली आणि अनेक इतिहास संशोधकांचा सहवास लाभला. गजाननरावांनी तर त्यांना कधीही फोन करून कुठलाही संदर्भ विचारायची मुभा दिली होती. त्यांच्याशी अनेकवेळा माझी प्रत्यक्ष भेट झाली होती. माझ्या आठवणीत गजाननराव कधी स्वस्थ बसलेत असं दिसलंच नाही. त्यांच्या घरी माझं अनेकदा जाणं व्हायचं तेव्हा त्यांच्यासमोर कायम हस्तलिखितं असायची, पुस्तकं असायची आणि कुठलाही संदर्भ विचारला तर, थांबा दाखवतो, म्हणत विशिष्ट संदर्भ ते समोर घेऊन यायचे, अगदी पृष्ठक्रमांकासहित.’
‘अशी माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत आणि कदाचित काळाच्या ओघात नाहीशीच होतील. बाबासाहेब पुरंदरे नेहमी म्हणायचे की ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात.’ आमच्या गजाननरावांकडे पाहिल्यावर मला नेहमी त्या वरच्या ओळी थोड्या बदलाव्याशा वाटायच्या की, इतिहासाचं वेड लागल्याशिवाय इतिहासाकडे पाहता येत नाही आणि इतिहासाचं वेड लागलेलीच माणसं इतिहास लिहितात’, अशा शब्दांत राज ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या आहेत.
गजानन मेहेंदळे हे अविवाहित होते. भारत इतिहास संशोधक मंडळ इथं आज (गुरुवारी) सकाळी अकरा वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
