
नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज मनसे आणि शिवेसेनेची प्रचारसभा पार पडली. आजच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. आजच्या आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी मनसेची सत्ता असताना केलेल्या विकासकामांची माहिती दिली आहे. तसेच राज ठाकरेंनी एक जुना किस्सा सांगिलता आहे. यात त्यांनी धमकी दिली होती अशी माहितीही दिली आहे. राज ठाकरेंनी नेमकी कुणाला धमकी दिली होती ते जाणून घेऊयात.
राज ठाकरे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, ‘आमची सत्ता असताना कुंभमेळा झाला. उत्तम पार पडला. एकही झाड कापलं नाही. पहिल्या पाच वर्षात आम्ही धरणातून पाईपलाईन आणली. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न सोडवून टाकला. जीपीएस लावलेल्या घंटा गाड्या सुरू केल्या. घनकचरा प्रकल्प सुरू केला. वाहतूक बेटांचं सुशोभिकरण केलं. बोटॅनिकल गार्डन केलं. या गार्डनची गेल्या पाच वर्षात वाट लावली आहे.’
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आम्ही आलो तेव्हा नाशिक पालिकेवर 700 कोटीचं कर्ज होतं. आम्ही महापालिका कर्जमुक्त केली. आम्ही पाच वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडून आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी महापालिका होती. रस्ते उत्तम केले होते. दर पावसाळ्यात पत्रकारांना चॅनलचे लोकं विचारायची खड्डे पडतात. मी इथल्या कंत्राटदारांची बैठक बोलावली होती. हे बजेट. तुमच्याकडे पैसे मागितले तर मला सांगा. बजेटमध्ये उत्तम रस्ते केले नाही आणि खड्डा पडला तर त्यात उभा करून मारेन. उत्तम रस्ते झाले. हे होऊ शकतं.
सभोवतालचं वातावरण बकाल आहे. त्यामुळे पोरं दुसरीकडे शिकायला जात आहे. कशाचा काही अटोक्यात नाही. अशा लोकांच्या हाती शहरं देणार आहात का. आनंद महिंद्रा, अंबानी टाटापासून सर्व आणली. ही माणसं कधी कुठल्या शहरात गेली नाही. प्रकल्प उभे केले. पाहायला काय मिळालं पराभव. ज्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या भूलथापांना बळी पडला. तुमच्या चिल्ल्यापिल्यांच भविष्य चांगलं करायचं असेल तर तुम्ही शिवसेना आणि मनसेच्या हाती सत्ता द्या. पुन्हा चांगलं नाशिक घडवल्या शिवाय राहणार नाही.