ठाकरे सरकारच्या कामगिरीवर नाखुश, रामदास आठवलेंच्या RPI कडून पर्यावरण विभाग सुरु

| Updated on: Jun 06, 2021 | 7:17 PM

आठवले यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या वतीने आजपासून पर्यावरण विभाग सुरु करत आहोत.

ठाकरे सरकारच्या कामगिरीवर नाखुश, रामदास आठवलेंच्या RPI कडून पर्यावरण विभाग सुरु
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
Follow us on

नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (5 जून) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले नवी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात आठवले म्हणाले की, जगभरात पर्यावरणाचा समतोल राखला पाहीजे. नवीन वृक्षलागवड केली करायला हवी, लावलेली झाडं जगवली पाहीजेत, निसर्गाचे रक्षण करणे हे मानवतेचे प्रथम कर्तव्य आहे. (Ramdas Athavale Unhappy with Thackeray government, RPI started Separate environment department)

यावेळी आठवले यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या वतीने आजपासून पर्यावरण विभाग सुरु करत आहोत. या कमिटीवर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून विजयराजे धमाळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच RPI आठवले पक्षाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

रामदास आठवले यांना ठाकरे सरकारवर तुम्ही समाधानी आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, तर त्यावर रामदास आठवले आपण सरकारवर समाधानी नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच ते म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ असं नाव द्यावं, अशी आमची भूमिका होती. परंतु येथील प्रकल्पग्रस्त आगरी बांधवांच्या भावना समजून आम्ही विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला समर्थन देत आहोत. तसेच येत्या 10 जूनला होणाऱ्या मानवी साखळी आंदोलनातदेखील आरपीआयचे कार्यकर्ते सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport – NMIA)दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी मांडली आहे. या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची आज अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आंदोलनात आरपीआय सहभागी होणार

दिबांच्या नावासाठी होणाऱ्या आंदोलनात आपला पक्ष आणि आपले कार्यकर्ते सर्व ताकदीनिशी सहभागी होतील, असेही रामदास आठवले यांनी जाहीर केले. तसेच 10 जूनच्या मानवी साखळी आंदोलनाला आणि 24 जूनच्या सिडको भवनाला घेराव घालण्याच्या आंदोलनालाही रिपब्लिकन पक्षाचा पाठिबा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

स्थानिकांची मागणी

तत्पूर्वी दिबा यांच्या नावासंबंधीची भूमिका सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी रामदास आठवले यांच्यापुढे विषद केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनीधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्यासंबंधीचा पत्रव्यवहार राज्य आणि केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे.

1984 साली राज्यव्यापी शेतकरी आंदोलन

1984 साली दिबांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई गावी, शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा म्हणून झालेल्या व देशभर गाजलेल्या शौर्यशाली अशा शेतकरी आंदोलनात पाच शेतकर्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या आंदोलनातून प्रस्थापित झालेले साडेबारा टक्के विकसित जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्याचे तत्त्व पुढे संबंध महाराष्ट्रातील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना लागू झाले. नवी मुंबईच्या विकासासाठी तिथल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर जनतेच्या प्रश्नांसाठी दिबांनी संबंध आयुष्य खर्ची घातलं. त्यामुळे त्यांच्या या कर्मभूमीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव देऊन त्यांची स्मृती अजरामर करणे, ही येथील सर्व जनतेची रास्त मागणी आहे, असे दशरथ पाटील यांनी म्हटले आहे.

इतर बातम्या

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी ठाणे ते पनवेल मानवी साखळी, प्रकल्पग्रस्त सिडको भवनाला घेराव घालणार

आता डिस्चार्जआधीच रुग्णालयाच्या बिलांचे लेखा परीक्षण, नवी मुंबई महापालिकेत कोव्हिड-19 बिल तक्रार निवारण कक्ष

(Ramdas Athavale Unhappy with Thackeray government, RPI started Separate environment department)