नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी ठाणे ते पनवेल मानवी साखळी, प्रकल्पग्रस्त सिडको भवनाला घेराव घालणार

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी ठाणे ते पनवेल मानवी साखळी, प्रकल्पग्रस्त सिडको भवनाला घेराव घालणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्यावं, या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे ते पनवेल अशी मानवी साखळी तयार केली जाणार आहे.

अक्षय चोरगे

|

May 25, 2021 | 6:17 PM

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport – NMIA) दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचं नाव द्यावं, या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे ते पनवेल अशी मानवी साखळी तयार केली जाणार आहे. तसेच सिडकोने केलेल्या कृतीचा निषेध करण्यासाठी आणि ‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त 24 जून रोजी हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सिडको भवनाला घेराव घालतील, असा निर्णय लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने घेतला आहे, याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली. (Navi Mumbai Locals demand airport to be named after DB Patil)

पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याच्या आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ कृती समितीची बैठक नुकतीच दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी हा सर्वपक्षीय निर्धार व्यक्त करण्यात आला.

आपली मागणी शासनाच्या कानी घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूर आणि ओबीसी समाजाचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्‍यांच्या संघटना एकत्र आल्याने हा लढा आता व्यापक प्रमाणात होत आहे.

10 जूनला आंदोलनाचे रणशिंग फुंकणार

येत्या 10 जूनला अखिल आगरी समाज परिषदेचे संस्थापक जी. एल. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकत्र जमून शपथ घेऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ठाणे ते पनवेल तसेच उरण, नवी मुंबई, भाईंदर, वसई, विरार, डहाणू, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर आदी ठिकाणी मानवी साखळी तयार करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. याचबरोबर येत्या 24 जून रोजी ‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त हा लढा व्यापक करण्यासाठी, लोकभावना पायदळी तुडवून सिडकोने केलेल्या कृतीचा निषेध करण्यासाठी सिडको भवनाला हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी घेराव घालणार आहेत, असा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीने घेतला असून मुख्यमंत्री, सर्व पक्षांचे प्रमुख नेते यांना यासंबंधीचे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे दशरथ पाटील यांनी सांगितले.

बैठकीसाठी विविध पक्षांचे नेते, जिल्ह्यांतील अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित

या बैठकीस कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, सल्लागार आणि माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, कार्याध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, उपमहापौर जगदिश गायकवाड, कार्यकारिणी सदस्य जे. डी. तांडेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाब पाटील, काँग्रेसचे संतोष केणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, सरचिटणीस भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, भाजप नेते दशरथ भगत, साई संस्थानचे विश्वस्त रवी पाटील, नवी मुंबईतील 95 गाव संघर्ष समितीचे दीपक पाटील, आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील, डोंबिवलीच्या 27 गाव संघर्ष समितीचे गुलाब वझे, अ‍ॅड. मनोज भुजबळ, कामगार नेते सुरेश पाटील, जासईचे मेघनाथ म्हात्रे, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, जितेंद्र घरत, आगरी समाज विकास संघाचे अध्यक्ष धीरज कालेकर, दिवा मच्छीमार संघटनेचे चंदू पाटील, सागरी जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष जयेश आकरे, तसेच नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इतर बातम्या

नवी मुंबईत 25 तारखेला पाणीपुरवठा खंडित, ‘या’ भागात पाणीपुरवठा होणार नाही

भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी रोखल्यामुळे अनर्थ टळला

(Navi Mumbai Locals demand airport to be named after DB Patil)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें