मोठी बातमी! शरद पवारांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देताच पक्षात पहिला राजीनामा
डिलिमिटेशनवरुन एनसीपी पक्षावर नाराज होत पवारांच्या एका पदाधिकाऱ्याने राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता हा पक्षातील अंतर्गत नाराजीतून आलेला पहिला राजीनामा म्हणून पाहिला जात आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर पक्षाच्या भूमिकेला विरोध करत एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी विचारधारा आणि पक्षाच्या भूमिकेबाबत थेट सवाल उपस्थित केले आहेत. राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या एकत चर्चा आहे ती म्हमजे डिलिमिटेशन. मोदी सरकारने सोमवारी या बिलावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेश बोलावलं आहे. पीएम मोदींनी एक ट्वीट शेअर करत बिल पास करण्याची हीच ती योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. पण दुसरीकडे आता शरद पवारांच्या पक्षात मोठी उलथापालथ होते की काय असं चित्र समोर आलं आहे. कारण पक्षातून राजीनामा आला आहे. हा राजीनामा देताना कार्यकर्त्याने त्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे.
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी समोर आली आहे. पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपला डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचा पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी तडजोड कशी करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राजीमाना पत्रात नेमकं काय?
पदापेक्षा विचार मोठे… सत्तेपेक्षा स्वाभिमान मोठा असं म्हणत खामकर यांनी राजीनामा पत्र सादर केलं आहे. मी राजकारणात पदासाठी आलो नाही, तर विचारांसाठी आलो आहे. पुरोगामी विचारांचा पाईक म्हणून संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी ही माझ्यासाठी केवळ भाषणातील शब्दांची सजावट नाही, तर माझ्या सार्वजनिक जीवनाचा मूलाधार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या विचारांशी जोडला गेलो, तेव्हा या पक्षाकडून पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा अधिक ताकदीने पुढे नेली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजच्या राजकीय परिस्थितीत पक्षाने घेतलेली भूमिका माझ्या वैचारिक भूमिकेशी विसंगत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी लिहिलं की, विशेषतः भाजपच्या राजकीय अजेंड्याशी संबंधित असलेल्या डिलिमिटेशन विधेयकाच्या समर्थनाच्या भूमिकेमुळे माझ्या मनात गंभीर वैचारिक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या राजकीय शक्तींच्या धोरणांशी आणि विचारसरणीशी आपण सातत्याने संघर्षाची भूमिका मांडत आलो, त्याच राजकीय भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय समर्थनीय कसा ठरू शकतो? राजकारणात तडजोडी होऊ शकतात. पण प्रत्येक तडजोडीला वैचारिक समर्थन देता येत नाही. सत्तेची गणिते आणि राजकीय सोयी यापेक्षा विचारांची निष्ठा माझ्यासाठी महत्त्वाची आहे.
माझा हा निर्णय कोणत्याही व्यक्तीविषयीचा द्वेष नाही, कोणत्याही पदाधिकाऱ्याविषयीची वैयक्तिक नाराजी नाही आणि कोणत्याही राजकीय लाभासाठी केलेले शक्तिप्रदर्शनही नाही. हा माझ्या सद्सद्विवेकबुद्धीचा आणि वैचारिक प्रामाणिकपणाचा निर्णय आहे. म्हणूनच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सोशल मीडिया सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. माझ्यासाठी पद सोडणे अवघड नाही, पण स्वतःच्या विचारांशी प्रतारणा करून पदावर राहणे अशक्य आहे, असं खामकरांनी म्हटलं आहे.