मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी अमित देशमुखांची फेसबुक पोस्ट, एका आवाहनाने लातूर बंदचे चित्र पालटलं, 12 तासात काय घडलं?
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे लातूरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमित देशमुख यांनी संयमी भूमिका घेत लातूर बंद मागे घेण्याचे आवाहन केले असून, भाजपला सुसंस्कृत मार्गाने उत्तर देण्याचे संकेत दिले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त विधानामुळे लातूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी स्थानिक संघटनांनी आज लातूर बंदची हाक दिली होती. मात्र विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी संयमी भूमिका घेत हा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. जनतेला नाहक त्रास नको म्हणून हा बंद मागे घ्या, असे अमित देशमुख यांनी सांगितले आहे.
नेमका वाद काय?
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच एका जाहीर सभेत बोलताना भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिल्यास विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, असा विश्वास वाटतोय, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या विधानामुळे लातूरकरांच्या भावना दुखावल्या गेल्या. केवळ राजकीय विरोध म्हणून नव्हे, तर लातूरच्या विकासात मोठे योगदान असलेल्या नेत्याबद्दल अशा शब्दात बोलल्याने काँग्रेससह अनेक सामाजिक संघटना आक्रमक झाल्या.
त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरमध्ये आहेत. लातूरमध्ये त्यांची सभा पार पडणार आहे. त्यांच्या सभेच्या दिवशीच शहरात तणाव वाढण्याची शक्यता होती. मात्र अशा वेळी अमित देशमुख यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहून समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “रवींद्र चव्हाण यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे. लातूरकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे खरं आहे, पण भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला आणि व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये. विलासराव साहेबांच्या विचारांवर ठाम राहून आपण लोकशाही आणि सुसंस्कृत मार्गाने या अपमानाचे उत्तर देऊ.” असे अमित देशमुख यांनी पोस्टमध्ये म्हटले.
राजकीय वातावरण तापले
एकीकडे बंदचे आवाहन मागे घेण्याची विनंती होत असली, तरी लातूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी १ वाजता शहरातील मेन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मोठी सभा होत आहे. या सभेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने आता निवडणुकीच्या मैदानात अधिक ताकदीने उतरण्याचे ठरवले आहे. अमित देशमुखांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळात कौतुक होत असले तरी, विलासरावांच्या चाहत्यांमधील रोष येत्या निवडणुकीत भाजपला महागात पडू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
