
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. यावर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण विषयावर अजित पवार यांच्यासोबत 20 मिनीट काटेवाडीमध्ये आपली बैठक झाली होती, असं अभिजित पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, त्या दृष्टीने प्रक्रिया देखील सुरु होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याचा निर्णय झालेला असून हाच निर्णय अंतिम होईल, अशा विश्वास अभिजित पाटील यांनी व्यक्त केला आहे. तुला सगळी मदत करतो. यापुढे आपण एक होणार आहोत. एकत्र काम करुयात.असे दादांनी मला त्याचवेळी सांगितले होते, असं पाटील यांनी म्हलटं आहे.
दरम्यान माढ्यात आपले सगळे उमेदवार घड्याळावर उभा करतो आणि सगळे निवडून आणतो, असा शब्द मी त्यावेळी दादांना दिला होता. हा शब्द सत्यात उतरवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आता टोकाचा आक्रमक प्रचार करणं शक्य नाही. दादांना मी दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर काही हरकत नाही, अजित दादांचे नेतृत्व हे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच तयार झालेले आहे, आणि त्यातच तुतारीला फार काही फायदा होत नाही. अनुभवी लोक एकत्र आले तर पक्ष वाढणारच आहे. नेतृत्व सुनेत्रा पवार यांनीच करावे, त्यांनी राजकारण जवळून पाहिलेले आहे. आमदारांच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर उद्या सायंकाळी शपथविधी होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान येत्या आठ तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा दावा राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी केला आहे. आठ ते दहा तारखेच्या दरम्यान दोन्ही पक्षाचे विलीनीकरण जाहीर होईल आणि पुन्हा आम्ही कामाला लागू असं विधान राजेश्वर चव्हाण यांनी केलं आहे. शरद पवार आणि अजित दादा दोघांच्या कार्यकर्त्यांना एक व्हायच आहे. दोघे एकत्र येऊन शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे राजकारण महाराष्ट्रात करायचे आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
माणिकराव कोकाटे यांचे प्रतिक्रिया
दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी देखील मोठं विधान केलं आहे. साधारण दोन दिवसापूर्वी बारामतीत ही घटना घडली, आमच्या आमदारांचं भवितव्य आमच्याकडून काळाने हिरावून घेतलं. यामुळे अजुनही महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे आमदार यांची मानसिकता कुठलीही गोष्ट बोलण्याची नाही, आम्हाला अशीच जाणीव होत आहे की दादा कुठेतरी बैठकीत बसलेले आहेत. जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका त्यांनी पार पाडली, आम्हाला विश्वास बसत नाही दादा आमच्यात नाही. त्यांच्या कुटुंबीयांशी राजकीय दृष्ट्या बोलणं कदापी शक्य नाही. आमचा पक्ष अजितदादाच होते. आम्ही सर्व आमदारांनी जेव्हा राष्ट्रवादीत जाण्याची भूमिका घेतली ती फक्त अजितदादांकडे पाहुन घेतली होती, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.