
कोकणातील प्रत्येकाचे गणपतीसोबत एक अनोखं नातं आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त कोकणात येतात. यंदाही मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणचे अनेक कोकणी कुटुंब हे गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून सुमारे ५ लाख ९६ हजार कोकणवासीयांनी एसटी बसने आपल्या गावी सुरक्षित प्रवास केला, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या प्रवासातून एसटी महामंडळाला तब्बल २३.७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांनी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, विशेषतः चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षक-अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या लाखो प्रवाशांची सोय करण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले होते. यंदा, कोकणवासीयांसाठी ५,००० जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत, या बसेसने १५,३८८ फेऱ्यांद्वारे ५ लाख ९६ हजार प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचवले. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करताना कोणताही अपघात झाला नाही, हा एक नवा विक्रमच आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
या प्रचंड वाहतुकीची यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी एसटी प्रशासनाने अथक परिश्रम घेतले. राज्यभरातील १०,००० हून अधिक चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षक-अधिकाऱ्यांनी या कामात मोलाची भूमिका बजावली. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी बसस्थानकांवर आणि बस थांब्यांवरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते.
त्याचप्रमाणे, कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात आली होती. तसेच, तातडीच्या मदतीसाठी आणि नादुरुस्त बसेसना पर्याय म्हणून चिपळूण, महाड आणि माणगाव आगारात १०० अतिरिक्त बसगाड्याही उपलब्ध ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. मंत्री सरनाईक यांनी या सर्व कर्मचाऱ्यांच्या धैर्याची आणि कठोर परिश्रमाची प्रशंसा करत या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यामुळे, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अत्यंत सुखकर झाला.