Jalgaon Robbery: ज्या खाकीवर सुरक्षेची जबाबदारी, त्याच खाकीतील माजी अधिकाऱ्याचा दरोड्यात सहभाग; जळगावमधील SBI दरोड्याचा थरारक उलगडा
Jalgaon Bank Robbery: जळगावमध्ये SBI बँकेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकच मास्टरमाइंड निघाला आहे. २७ किलो सोन्यासह १५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील भोकर गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यात लुटलेले २७ किलो सोने आणि १५ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या दरोड्याचा मास्टरमाइंड बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासर, अंकुश चव्हाण आणि अंकुश तुळशीराम चव्हाण अशी अटकेतील आरोपींपैकी काहींची नावे आहेत. या तिघांसह चौघांनी मिळून बँकेवर दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शंकर जासर हा या संपूर्ण गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी भोकर येथील SBI शाखेत प्रवेश करत कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला.
बँक व्यवस्थापक आणि कॅशियर यांना मारहाण करून त्यांनी तिजोरीतील सोने आणि रोख रक्कम लुटली. यावेळी बँकेतील सुरक्षारक्षकावर एका दरोडेखोराने बंदुकीतून गोळी झाडल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या दरोड्याचे गांभीर्य आणखी वाढले आहे. दरोड्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून चारही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून दोन बंदुका आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
तसेच बँकेतून लुटलेले २७ किलो सोने आणि १५ लाख रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर जासर याच्यावर यापूर्वीही दरोडा आणि लाच घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर रायगड येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
पोलीस दलात अधिकारी म्हणून काम केलेल्या व्यक्तीचाच सशस्त्र दरोड्यात सहभाग उघड झाल्याने या घटनेची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. बँकेतील दरोड्याचे नियोजन कसे करण्यात आले, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
