चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है… महिला नेत्याचा खोचक टोला; तुफान व्हायरल होतंय ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसेंनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवर केंद्र सरकारला 'चाकू खरबूजे पर' म्हणत खोचक टोला लगावला आहे. पाच दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ झाल्याने सामान्य माणूस भरडला जात असल्याचे त्यांनी म्हटले. आगामी काळात इंधन दर कलेकलेने वाढतील असा दावा करत, वाशिम आणि नंदुरबारसारख्या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या इंधन टंचाईवरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है... महिला नेत्याचा खोचक टोला; तुफान व्हायरल होतंय ट्विट
रोहिणी खडसेंची पोस्ट
| Updated on: May 19, 2026 | 10:57 AM

चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है ! असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सामान्य माणसाची व्यथा मांडली आहे. पाच दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेल भावात वाढ झाल्याने रोहिणी खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात असंच कलेकलेने दरवाढ करेल, असा दावाही त्यांनी केला आहे. पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढल्याने त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, मागच्या वेळी पेट्रोल डिझेलच्या भावात घसघशीत 3 रुपये वाढवले होते.‌ त्यामुळे लोकांनी केंद्रात सत्तेवर बसलेल्या भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत झोडपून काढले होते. या गोष्टीतून धडा घेत आज पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढवलेले दिसत आहे. आज देशाची जी परिस्थिती आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात असंच कलेकलेने दरवाढ करेल असं दिसतंय. पण शेवटी काय? पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भुर्दंड हा सामान्य जनतेला सहन करायचाच आहे, अशी खंत व्यक्त करतानाच चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है, असा खोचक टोला खडसे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

 

घाबरू नका, अतिरिक्त साठा करू नका

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. तर काही ठिकाणी पेट्रोल नसल्याने पंपावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पेट्रोल-डिझेल तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्पष्टीकरण देत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मागील वर्षी मे महिन्यात जितका पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात आला होता, त्यापेक्षा यंदा तब्बल 20 टक्के अधिक इंधन पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठा करू नये. एक महिन्यापूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी प्रशासनाने आवाहन केल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली होती. यावेळीही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरजेपुरतेच इंधन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

नंदूरबारमध्ये रांगाच रांगा

दरम्यान, नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचे फलक लावण्यात आलेले आहेत.इंधनटंचाई तीव्र झाल्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधन कंपन्यांकडून अपुरा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. युद्धाचा अप्रत्यक्ष फटका नागरिकांना बसताना दिसत आहे.

 

Follow Us