
अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून तो महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस होता. आजही अनेक सामान्य लोकांना प्रेमापोटी वाटते की दादा कुठेतरी बाहेर येतील आणि आपल्याला भेटतील. पण दुर्दैवाने तो दिवस येणार नाही, हे वास्तव आपल्याला स्वीकारावे लागेल, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा तपास ज्या पद्धतीने होत आहे, त्यावर राज्य सरकार आणि यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत.
राज्यातील विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात डीजीसीएने दिलेल्या अहवालाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील जनतेची आणि सामान्य लोकांची हीच इच्छा आहे की, या अपघातामागील सत्य समोर यावे. हा केवळ अपघात होता की घातपात? यात नक्की काय घडले? कुणी केले? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. लोक चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत यावर चर्चा करत आहेत आणि दादांना न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
यावेळी रोहित पवारांनी डीजीसीए (DGCA) च्या अहवालाचा संदर्भ देत तपासातील विसंगतींवर बोट ठेवले. त्यांनी सांगितले की २८ जानेवारीला जेव्हा अजित दादांचे पार्थिव रुग्णालयात होते, त्याच दिवशी दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी डीजीसीएने पहिला अहवाल दिला. या अहवालात लेव्हल १ ची कोणतीही अडचण नसल्याचे सांगून संबंधित विमान कंपनीला (VSR) क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला. ज्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत आहोत, त्यांनीही दुर्दैवाने या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र काल आलेल्या अहवालात डीजीसीएने काही त्रुटी मान्य केल्या आहेत, पण ते यश नखाएवढे आहे, असे रोहित पवार म्हणाले.
कालच्या अहवालात त्यांना अनेक त्रुटी जाणवल्या. विमान उडवायच्या आधी त्याला एक सर्टिफिकेट असतं, त्यात त्यांना त्रुटी दिसल्या. त्याच्या सुरक्षेबद्दल त्रुटी दिसल्या. फ्लाईटमध्येही दिसल्या. तुम्ही आता जे बोलताय त्यातून एक नेता गेला. या रिपोर्टमध्ये आताही ते व्हिएसआरला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सरकार फक्त ॲक्शन घेतली आहे, असे दाखवत आहे. पण प्रत्यक्षात विमान कंपनीला त्यांच्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा विमान उडवण्याची अप्रत्यक्ष परवानगी दिली आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणातील गुंतागुंत आणि समोर आलेले नवीन पुरावे यावर चर्चा करण्यासाठी येत्या दोन दिवसात सविस्तर पत्रकार परिषद घेऊ, असे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या पत्रकार परिषदेत डीजीसीएच्या अहवालाबद्दल मोठा गौप्यस्फोट करु, असे सांगितले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.