तुमच्या घरातील गादी आणि सोफा 20 लाखांचा अन् शेतकऱ्याला एकरी ३४०० ची मदत… रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीनंतर शेतकऱ्यांना मिळत असलेल्या मदतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने जाहीर केलेली एकरी ३४०० रुपयांची मदत अपुरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्या सरकारी घरात बेडरूमची गादी आणि सोफा २० लाखांचा आहे आणि आमच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकरी ३४०० रुपये मदत… एवढ्या अलिशान सरकारला ही तुटपुंजी मदत शोभते का?” असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
एकरी ३४०० रुपयात काय होणार?
रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन काही ट्वीट केले आहेत. यात त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरुन संताप व्यक्त केला आहे. नुकतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२०० कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचे सांगितले होते. आता रोहित पवार यांनी या आकडेवारीवर बोट ठेवत ही मदत अपुरी असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी २२०० कोटीची मदत केली असल्याचं सांगितलं, परंतु मदत कोणत्या दराने दिली हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं. ३१.५ लाख शेतकऱ्यांना २२१५ कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी ७००० रु दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ८५०० प्रती हेक्टर म्हणजेच ३४०० रु. एकरी याप्रमाणे देण्यात आली. एकरी ३४०० रुपयात काय होणार आहे? असा सवाल रोहित पवार यांनी केला.
तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी आणि सोफा २० लाखाचा आणि आमच्या उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला एकरी ३४०० रु. मदत… एवढ्या अलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि इतर सर्व मंत्री हेक्टरी ५० हजार रु. मदत देणार की नाही, यावर बोलायला तयार नाहीत. आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको तर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रु. मदत द्यावी…!, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी २२०० कोटीची मदत केली असल्याचं सांगितलं, परंतु मदत कोणत्या दराने दिली हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं.
३१.५ लाख शेतकऱ्यांना २२१५ कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी ७००० रु दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ८५०० प्रती हेक्टर म्हणजेच ३४०० रु. एकरी… pic.twitter.com/NZWv19pu76
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 24, 2025
सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे
रोहित पवार यांनी यावेळी ट्वीट करत त्यांच्या मतदारसंघातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात सुमारे २५० हून अधिक विजेचे खांब कोसळले असून, काही ठिकाणी डीपीही वाहून गेले आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, पिण्याचे पाणी आणि मोबाईल चार्जिंगसारख्या मूलभूत गरजांसाठीही लोकांना अडचणी येत आहेत. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, मागील कामांची बिले न मिळाल्याने कंत्राटदार दुरुस्तीची नवीन कामे करण्यास तयार नसल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे त्यांनी सांगितले. या गंभीर बाबीकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी मतदारसंघातील जवळके, बावी, बोर्ला, जवळा आदी गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पावसात पिके वाहून गेली असून, अनेक बंधाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
