रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार, ED कडून पुरवणी आरोपपत्रात काय काय झाले आरोप?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोची ५० कोटींची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केली आहे. तसेच त्यांची दोन वेळा ईडीकडून चौकशी झाली होती.

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल करत अनेक आरोप केले आहेत. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणातही रोहित पवार यांना पुरवणी आरोपपत्रात ईडीने आरोपी बनवले आहे. तसेच रोहित पवार यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा ईडीचा आरोप आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देत आपला न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी दोन वेळा चौकशी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोची ५० कोटींची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केली आहे. तसेच त्यांची दोन वेळा ईडीकडून चौकशी झाली होती. आता ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल करत आणखी काही आरोप ठेवले आहेत. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा केल्याचा ठपका ठेवला आहे. कन्नड सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर राबवल्याचाही आरोप ईडीने केला आहे.
कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या… pic.twitter.com/J7zdxNtWS2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 12, 2025
न्यायदेवतेवर विश्वास, दूध-दूध आणि पाणी का पाणी…
रोहित पवार यांनी ईडीच्या पुरवणी आरोपपत्रानंतर एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कुणाचे आणि काय ऐकले नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे. याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी आहेत. त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचे पालन केले. आता आरोपपत्रही दाखल केले. म्हणजेच तपास पूर्ण झाला आहे. ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ स्पष्ट होईलच! विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही. संघर्षालाच डोक्यावर घेतले, हा इतिहास आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
