..तोपर्यंत आंदोलन मागे नाही; कर्जमाफीवरून रोहित पवारांची रोखठोक भूमिका, सरकार अडचणीत, पंढरपुरात नेमकं काय घडतंय?

30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु या कर्जमाफीमधील एका अटीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.

..तोपर्यंत आंदोलन मागे नाही; कर्जमाफीवरून रोहित पवारांची रोखठोक भूमिका, सरकार अडचणीत, पंढरपुरात नेमकं काय घडतंय?
rohit pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 12, 2026 | 8:48 PM

30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु या कर्जमाफीमधील एका अटीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने कर्जमाफीमधील अटी रद्द करून दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे, आणि त्यासाठी पंढरपूरमध्ये रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे.

सरकारकडून दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे. दोन लाखांच्या आत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज असेल त्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होईल, परंतु दोन लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांना आधी ती रक्कम एकाचवेळी भरावी लागेल. तेव्हाच त्या शेतकऱ्यांना दोन लाखांच्या कर्जमाफीचा फायदा मिळेल. जर एखाद्या शेतकऱ्यावर तीन लाखांचं कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याला आधी एक लाख रुपये एक रकमी भरावे लागतील, त्यानंतरच त्याला दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा होईल. मात्र ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान 40 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल असा दावा सरकारने केला आहे, परंतु 16 लाख शेतकरी असे आहेत, ज्यांचं कर्ज हे दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्यामुळे त्यांना अधिकची रक्कम आधी बँकेत भरावी लागणार आहे, तेव्हाच त्यांना या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. ही अट रद्द करावी या मागणीसाठीच रोहित पवार यांचं हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.

रोहित पवार यांची या संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानंतर कृषीमंत्री यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा केली. रोहित पवारांच्या  चर्चेबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कृषीमंत्री भरणे यांनी रोहित पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.

दरम्यान त्यानंतर आता रोहित पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. सरकार जोपर्यंत ती जाचक अट काढण्याची भूमिका माध्यमांसमोर मांडत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, सरकारच्या मंत्र्यांनी टीव्हीवर येऊन आश्वासित करावं, की ती अट आम्ही घालणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us