राम मंदिराच्या उभारणीसाठी राज्यपाल कोश्यारींकडून 1,11,000, तर माजी खासदार रामशेठ ठाकूरांकडून 1 कोटींचा निधी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उभारणीसाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:22 PM, 16 Jan 2021
राम मंदिराच्या उभारणीसाठी राज्यपाल कोश्यारींकडून 1,11,000, तर माजी खासदार रामशेठ ठाकूरांकडून 1 कोटींचा निधी

नागपूर/पनवेल : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उभारणीसाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. राम मंदिर उभारणीसाठी नागपुरात आजपासून निधी संकलनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी मंदिर उभारणीसाठी निधी दिला. तसेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पनवेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. (Rs 1.1 lakhs from Governor Bhagatsingh Koshyari and Rs 1 crore from former MP Ramsheth Thakur for construction of Ram Mandir of Ayodhya)

यावेळी बोलताना राजपाल कोश्यारी म्हणाले की, या मंदिरासाठी खूप यात्रा निघाल्या आहेत. आता हे मंदिर उभं राहणार आहे. श्रीरामाने पूर्ण देशाला ऐक्यात बांधून ठेवलं आहे. राम फक्त राम नाही तर आमच्या सर्वांसाठी एक राष्ट्र आहे. खूप मोठ्या संघर्षानंतर आम्ही राम मंदिर बनवत आहोत. मात्र, संकल्प अजून अपूर्ण आहे. आपल्याला देशात रामराज्य आणायचे आहे. देश एका योग्य दिशेत चालला आहे. प्रत्येक घरात जाऊन राम मंदिरासाठी त्यांचं योगदान घ्यायचं आहे. भव्यदिव्य राम मंदिर तयार होणार आहे, त्यात सगळ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे.

नागपुरातील पोद्दरेश्वर राम मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अयोध्या राम मंदिर ट्रस्ट कडून स्वामी अवधेशानंद गिरी महाराज उपस्थित होते. श्रीरामाची आरती करत या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी संघ परिवारातील लोकांसह इतर रामभक्त सुद्धा उपस्थित होते.

रामशेठ ठाकूर यांच्याकडून 1 कोटी रुपयांचा निधी

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पनवेलचे संघचालक प्रशांत कोळी यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर हेसुद्धा उपस्थित होते. दरम्यान, पनवेलमधील 52 दानशूर व्यक्तिंनी यावेळी राम मंदिर उभारणीसाठी धनादेश दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी नियोजित मंदिर उभारलं जाणार आहे. हे मंदिर पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून मकर संक्रांतीपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून त्यासाठी निधी संकलन सुरू झाले आहे. यावेळी पनवेल शहरातून सुरू होणाऱ्या या निधी संकलन अभियानाच्या कार्यालयाचे पनवेलमधील डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी दिला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पनवेलचे संघचालक प्रशांत कोळी यांच्यासह कोकण प्रांताचे सह-कार्यवाहक वोगळे, शिरीष देशमुख तसेच निधी संकलन अभियान पनवेल शहाराचे प्रमुख राजीव बोरा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हे निधी संकलन अभियान महिनाभर चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

राम मंदिराच्या उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पाच लाखांचा धनादेश

‘राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध’! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप, गृह मंत्रालयाला कायदेशीर नोटीस

Ayodhya : राम मंदिर ट्रस्टला 200 किलो चांदीची देणगी, चांदीदान थांबवण्याची वेळ

Ayodhya Ram Mandir | राम मंदिराचं निर्माण हे भाजपचं स्वप्न : लालकृष्ण आडवाणी

(Rs 1.1 lakhs from Governor Bhagatsingh Koshyari and Rs 1 crore from former MP Ramsheth Thakur for construction of Ram Mandir of Ayodhya)