Abu Azami : औरंगजेबाला महान राजा म्हणणाऱ्या अबू आझमींवर अखेर कारवाई
Abu Azami : औरंगजेबाला महान राजा म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. "औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता" असं अबू आझमी म्हणालेले.

औरंगजेबाला महान राजा म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात अखेर सरकारने कारवाई केली आहे. अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. “अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करत आहोत. त्यांना विधान भवन परिसरात येण्यास बंदी असेल” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. “फक्त या अधिवेशनापुरता निलंबन नको. कायम स्वरूपी निलंबन करा” अशी सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक झालेले. “फक्त अधिवेशन काळापुरते निलंबन नको. त्यांचे सर्व भत्ते बंद करा. आमदार निधी व पगार ही बंद करा. औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. प्रस्तावात सुधारणा करा. कारवाई अधिक कठोर करा” अशी सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली.
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या सत्रात अबू आजमी यांना निलंबित करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. “छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही सहजतेने जाऊ देऊ शकत नाहीत” असं सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं होतं.
कायम स्वरुपी निलंबित करता येऊ शकत का?
“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आमदारांना एकासत्रापेक्षा जास्तकाळ निलंबित करता येऊ शकत नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. “आमदार म्हणून अबू आजमी यांना निलंबित करता येऊ शकत का? याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही समिती स्थापन करु” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
अबू आझमी काय म्हणालेले?
“मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता. त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते. तो न्यायप्रेमी सम्राट होता. आम्हाला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते. औरंगजेबाची कबर खोदण्याची भाषा करणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत” असं अबू आझमी म्हणालेले.
पडसाद उमटल्यानंतर आझमींची माघार
अबू आझमी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. यानंतर दोन्हीही सभागृहात अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यांच्या या विधानानंतर अबू आझमींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर अबू आझमी यांनी एक व्हिडीओ शेअर करत केलेले विधान मागे घेत असल्याचे सांगितले.