
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मुंबईचा आगामी महापौर उत्तर भारतीय समाजाचा असेल असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात वादाची ठिणगी पडली आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेने ठाकरे गटाने सामना अग्रलेखाद्वारे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर अत्यंत तिखट शब्दात टीका केली. “मुंबईवर अमराठी महापौर लादण्याचा प्रयत्न झाला तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याप्रमाणे भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यातून देण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखात मुंबईच्या संघर्षाचा इतिहास अधोरेखित करण्यात आला आहे. मुंबई ही भावनिक, भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या केवळ मराठी माणसाचीच आहे. पैशांच्या जोरावर मुंबई विकत घेता येईल किंवा तिचे चारित्र्य बदलता येईल, असे भाजपच्या कृपाशंकर छाप नेत्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. ज्यांना हा इतिहास माहीत नाही, त्यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकासमोर जाऊन नतमस्तक व्हावे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी १०६ जणांनी बलिदान दिले आहे. गरज पडल्यास त्या बलिदानाची परंपरा यापुढेही सुरू राहील,” अशा कडक शब्दात शिवसेना ठाकरे गटाने टीका केली.
भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्यावर टीका करताना सामना अग्रलेखात त्यांच्या जुन्या प्रकरणांचा पाढा वाचण्यात आला आहे. एकेकाळी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले कृपाशंकर सिंह अटक टाळण्यासाठी भाजपला शरण गेले. फडणवीसांच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून ते स्वच्छ झाले. मात्र, ज्यांना उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या जनतेने दारुण पराभवाचा धक्का दिला, ते आता मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसवण्याची स्वप्ने पाहत आहेत,” असा टोला त्यांना लगावण्यात आला. भाजप स्वतःच्या मळमळलेल्या भावना कृपाशंकर यांच्या मुखातून बाहेर काढत असल्याचा आरोपही यात केला आहे.
कोरोनाच्या भीषण काळात जेव्हा हे कष्टकरी हिंदी भाषिक आपल्या गावी परतत होते, तेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या भाजप सरकारने राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यांना स्वतःच्या गावात शिरू दिले नाही. त्या संकटकाळी केवळ उद्धव ठाकरे यांनी जात, धर्म किंवा प्रांत न पाहता सर्वांना अन्न आणि उपचार दिले. आता मात्र निवडणुका जिंकण्यासाठी भाजप हिंदी भाषिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठी-अमराठी वाद पेटवू पाहत आहे,” अशी घणाघाती टीका अग्रलेखातून करण्यात आली.
तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन सत्तेत बसलेले लोक आज भाजपच्या मराठीद्वेष्ट्या विधानांवर गप्प का? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. भाजपची पाठराखण करण्यासाठी शिंदे गटाचे नेते या विधानाला कृपाशंकर यांचे वैयक्तिक मत म्हणत आहेत. हे लाचार लोक आतमध्ये शेपटा घालून बसले आहेत, यांच्या जिनगानीवर थुंकले पाहिजे, अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी, मुंबईशी असलेले मराठी माणसाचे नाते तोडणे अशक्य असून, भाजपचे कितीही बाप उतरले तरी मुंबईचा मराठी बाणा झुकणार नाही, असा विश्वास अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.