जालन्यात संभाजी भिडेंच्या बैठकीआधीच राडा, कार्यकर्त्यांची धरपकड

जालन्यात संभाजी भिडेंच्या बैठकीआधीच राडा, कार्यकर्त्यांची धरपकड

जालना : शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या जालन्यातल्या बैठकी दरम्यान चांगलाच गोंधळ बघायला मिळाला. बहुजन संघटनांनी शहरात ठिकठिकाणी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संभाजी भिडे यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या काही बहुजनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

संभाजी भिडे जालना दौऱ्यावर असताना बहुजन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. शहरातल्या आर्य समाज मंदिरात भिडे यांच्या बैठीकचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बहुजन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

भारिप बहुजन संघटनेचं विरोध प्रदर्शन जालन्यात मामा चौकात होणार होतं. संभाजी भिडेंचा फोटो असलेला बॅनरही कार्यकर्त्यांच्या कारमध्ये होते. पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना रोखलं आणि ताब्यात घेतलं. शिवाय भारिप, संभाजी ब्रिगेड आणि बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं.

गडकोट मोहिमेच्या तयारीच्या बैठकीसाठी संभाजी भिडे यांची ही जालन्यातील आर्य समाज मंदिरात बैठक पार पडली. यावर्षी 27 जानेवारी ते 31 जानेवारी राजगड ते रायगड अशी पाच दिवसांची मोहिम असेल. रायगडावर शिवरायांच्या 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी जालनेकरांनी योगदान देण्याचं आवाहन बडी सडक रोडवरील आर्य समाज मंदिरात बैठकीत करण्यात आलं.

संभाजी भिडे जिल्ह्यात येणार हे माहित झाले तेव्हापासून बहुजन संघटनांनी ही बैठक उधळून लावण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांच्या धरपकडीनंतर संभाजी भिडे यांची ही बैठक सुरळीत पार पडली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI