
माजी अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्याबाबत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा खुलासा केला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात खैरे यांचा एकछत्री कारभार चालायचा. पण गेल्या दोन टर्मपासून त्यांना खासदारकीपासून दूर व्हावे लागले. तर पक्ष फुटीनंतर त्यांच्या समोर अनेक आव्हानं उभी ठाकली आहेत. आता कराडविषयी त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकारणातील एक पदर उलगडला गेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठा बदल होता होता राहिल्याचे आता समोर येत आहे.
ठाकरे ब्रँड लोकांना हवा
जनता आता पूर्णपणे ठाकरे परिवाराच्या बाजूने आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला ब्रँड लोकांना हवा आहे असे चंद्रकांत खैरे म्हणाले. त्यांनी लोकांना हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत असं वाटत असल्याचे सांगितले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्रमध्ये वातावरण बदलले आहे, असे ते म्हणाले. महापालिका स्वबळावर लढवण्याबाबत संजय राऊत बोलले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा जबरदस्त होणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भागवत कराडांबाबत मोठा खुलासा
भागवत कराड यांना मीच नगरसेवक आणि महापौर केले. गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाऊन कराड यांना मी दोन वेळा महापौर केलं. भागवत कराड हा माझ्यासमोर किरकोळ आहे, मी त्याला मोठे केले, कराड हे माझ्याकडे शिवसेनेत येण्यासाठी आले होते, असा गौप्यस्फोट खैरेंनी केला. पण गोपीनाथ मुंडे म्हणाले , तू आमचा माणूस का घेतो म्हणून सोडून दिले, असा खुलासा खैरेंनी केला.
पंकजा मुंडे बाबत वाद झाला होता म्हणून भागवत कराड यांना खासदार केले, भागवत कराड यांना मंत्रीपद दिलं आणि नंतर कराड हे निष्क्रिय आहेत म्हणून मंत्रीपद काढूनही टाकण्यात आले, भागवत कराड आता एकटेच फिरतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
मी एकनिष्ठ माणूस आहे, मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, मी शिवसेना संस्थापकापैकी एक आहे आणि मी कुठेही गेलो नाही, आणि लोकांना माझे वर्चस्व माहीत आहे, आणि कराड म्हणतात माझे वर्चस्व राहिले नाही, मी रस्त्यावर उतरलो की लोक जमा होतात, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. गोपीचंद पडळकर हे सध्या काहीही बोलायला लागला आहे. त्याला उगीच प्रसिद्धी देऊ नये. ते उगाच भांडणं लावत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी लव्ह जिहाद प्रकरणात केला.