किरीट सोमय्या गुप्त बैठकीसाठी औरंगाबादमध्ये दाखल, शेकडो पोलिसांचा फौजफाटा, काहीतरी मोठं घडतंय?

| Updated on: Aug 16, 2023 | 9:04 PM

Kirit Somaiya Aurangabad Visit | भाजप नेते किरीट सोमय्या आज अचानक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण त्यांच्या सुरक्षेसाठी शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

किरीट सोमय्या गुप्त बैठकीसाठी औरंगाबादमध्ये दाखल, शेकडो पोलिसांचा फौजफाटा, काहीतरी मोठं घडतंय?
Follow us on

औरंगाबाद | 16 ऑगस्ट 2023 : भाजप नेते किरीट सोमय्या गुप्त बैठकीसाठी औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. सोमय्या यांच्या दौऱ्यासाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीए उपेंद्र मुळे यांच्या भेटीसाठी किरीट सोमय्या औरंगाबादमध्ये आले आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ईडी चौकशीवेळी उपेंद्र मुळे यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर किरीट सोमय्या उपेंद्र मुळे यांच्या भेटीसाठी आता औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांना शेकडो पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे सोमय्यांच्या या दौऱ्याचं गूढ वाढलं आहे.

किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. ते सीए उपेंद्र मुळे यांच्या भेटीसाठी आले आहेत. भावना गवळी यांच्या ईडी प्रकरणावेळी उपेंद्र मुळे यांचं नाव चर्चेत आलं होतं. भावना गवळी यांनी आपल्याला चुकीचे कागदपत्रे बनवण्याचं सांगितलं होतं, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर भावना गवळींच्या माणसांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही उपेंद्र मुळे यांनी केला होता. मुळे यांनी प्रकरणी पोलिसात तक्रार केली होती. त्याच उपेंद्र मुळे यांची किरीट सोमय्या भेट घेत आहेत.

किरीट सोमय्यांच्या सुरक्षेसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी

किरीट सोमय्या या भेटीत भावना गवळी यांच्याविषयी चर्चा होते की, महाराष्ट्रातील इतर विषयांवर चर्चा होते याचा तपशील समजू शकलेला नाही. पण किरीट सोमय्या यांच्या औरंगाबाद दौऱ्यासाठी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. उपेंद्र मुळे यांच्या इमारतीच्या खाली 5 ते 6 पोलीस निरीक्षक, 10 ते 12 पोलीस उपनिरीक्षक, 20 ते 25 वेशातले पोलीस, तर 70 ते 80 साध्या वेशातले पोलीस आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या उपेंद्र मुळे यांची भेट घेऊन कोणत्या विषयांवर चर्चा करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.