सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा भीषण अपघात, आयुक्तांना डोक्याला दुखापत झाल्याची माहिती
सांगली, मिरज आणि कुपवाडा शहर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात शुभम गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सांगलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सांगली शहरातील गव्हर्मेंट कॉलनीत गुप्ता यांची शासकीय गाडी एका खांब्याला धडकली. या अपघातात आयुक्त शुभम गुप्ता यांना डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुभम गुप्ता यांच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील स्फूर्ती चौक येथे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीच्या समोर अचानक कुत्रे आडवे आले. त्यामुळे त्यांनी तातडीने ब्रेक मारला आणि गाडी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची गाडी खांब्याला धडकली. या घटनेत शुभम गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली.
संबंधित घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरीक शुभम गुप्ता यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी शुभम गुप्ता यांना गाडीतून बाहेर काढलं. तसेच अपघातग्रस्त गाडी बाजूला केली. त्या गाडीला रस्त्याच्या कडेला बाजूला लावण्यात आलं आणि शुभम गुप्ता यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.