…तर लोकांनी मला मारलं असतं, मनोज जरांगेंच्या नाराजीवर संजय जाधव काय म्हणाले?
परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या शेतकरी मेळाव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यावर आता खासदार संजय जाधव यांनी मोठं विधान केलं आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी निर्णायक आंदोलन होईल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे आज परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत.
या मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय जाधव यांना ही चूक महागात पडेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणासाठी स्टेजवर उभे राहताच मराठा आंदोलकांनी कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केल्याचं देखील पहायला मिळालं. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांनी यावेळी त्या आंदोलकांना स्टेजवर बोलावलं.
दरम्यान संजय जाधव यांनी या कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणादरम्यान दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. मी मनोज जरांगे पाटील यांचे मनापासून स्वागत करतो, साहेब 11 वाजता कार्यक्रम होता, ऐन वेळी कार्यक्रम रद्द झाला असता तर लोकांनी मला मारलं असतं. हा कार्यक्रम रद्द झाला असता तर काय संकट ओढावलं असतं सांगता येत नव्हतं. आम्ही तुमचेच आहोत, शिंदे साहेब देखील आपलेच आहेत. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं सजंय जाधव यांनी म्हटलं आहे.
कार्यक्रमस्थळी गोंधळ
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल होताच, मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलक व्यासपीठाकडे निघाले होते, त्यांना पोलिसांनी अडवलं, आक्रमक झालेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. भाषणावेळी देखील काही जणांनी घोषणाबाजी केली, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. त्या आंदोलकांना शिंदे यांनी स्टेजवर बोलवलं.