निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्ष, तब्बल 90 लाख मतं…, संजय राऊतांचा सर्वात मोठा आरोप

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर ९० लाख मतं डिलिट केल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्ष असल्याची टीका करत त्यांनी पश्चिम बंगालमधील निकालांवर संशय व्यक्त केला आहे.

निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्ष, तब्बल 90 लाख मतं..., संजय राऊतांचा सर्वात मोठा आरोप
sanjay raut pm modi
| Updated on: May 04, 2026 | 10:34 AM

देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या प्राथमिक कलानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर तामिळनाडूत टीव्हीके १०६ जागा, पुद्दुचेरीत भाजप २२, आसाम भाजप ९० जागांवर आघाडीवर आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीतील विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर एकाच वेळी ९० लाख मत डिलिट केल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष आहे, अशीही टीका केली आहे.

एकाच वेळी ९० लाख मतं डिलिट

सुरुवातीचे कल पोस्टल मतदानाचे होते. आता हळूहळू मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आपल्याला निकाल काय लागणार हे पाहण्यासाठी भरपूर वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजप स्पर्धेत आहे किंवा टक्कर देतंय. ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग, भाजप आणि मोदी-शाह यांनी जवळपास ९० लाख मत मतदार यादीतून काढली. जेव्हा एकाच वेळी ९० लाख मत डिलिट केली जातात, त्याचा परिणाम निकालावर होतो, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

मतदारांनी अद्याप कौल दिलेला नाही. ठिकठिकाणी सुरुवातीचे कल आहेत. मतमोजणीच्या २० ते २२ फेऱ्या सुरु असतात. शेवटच्या दोन किंवा तीन फेऱ्यांमध्येच निकाल लागतात. सध्या हे जे निकाल येतात ते सुरुवातीचे कल आहेत. आपल्याला थोडं थांबावं लागेल. २० ते २५ फेऱ्या चालतात आणि त्यानंतर निकाल लागतात. तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीत हे निकाल सांगू शकत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना दुसरं काम काय, निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम आहे. देशात किंवा महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होतात, भ्रष्टाचार होतात, महागाई वाढली, नोकऱ्या नाहीत, त्या संदर्भात तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण एखाद्या राज्यात निवडणुका आल्या की मोदी शाहांचं संपूर्ण सरकार हे तळ ठोकूनच बसतं. तसे ते बसले. देशाच्या हिताचं विकासाचं काम त्यांच्या दृष्टीक्षेपात आहे असं मला तरी वाटत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले

निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष आहे. ते असतील तर काहीही करु शकतात. पश्चिम बंगालमध्ये काहीही होऊ शकतं. जेव्हा भाजपला निवडणुका जिंकायच्या असतात, तेव्हा ते हे सर्व हातखंडे वापरतात. ९० लाख मतदार कापले, सीसीटीव्ही गायब करणे, वीज कापणे अजूनही बरेच प्रकार ते करतात. पश्चिम बंगलामध्ये खूप मतमोजणी बाकी आहे. राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुका प्रतिकात्मक आहेत. तिथे कोणीही उमेदवार दिलेला नाही. या ठिकाणी अपक्ष लढत असल्याने निवडणुका होत आहेत. राहुरीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे, असेही संजय राऊतांनी सांगितले.

Follow Us