Sanjay Raut : लाडक्या बहिणींना 1500 देऊन अब्रू विकत घेताय ? राऊत भडकले, लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवकपद देण्यावरून भाजपवर हल्लाबोल

बदलापूरच्या शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवकपद दिलं आहे. त्यावरून संजय राऊतांनी भाजपावर हल्ला चढवला असून एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे असा व्यभिचार करायचा, त्यांना विकत घेत आहात का अशी शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींना 1500 देऊन अब्रू विकत घेताय ? राऊत भडकले, लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवकपद देण्यावरून भाजपवर हल्लाबोल
संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 10, 2026 | 10:41 AM

बदलापूरच्या शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने अख्ख राज्य हादरलं. या बहुचर्चित प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यालाच भाजपने कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केल्याने एकच खळबळ माजली आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून नागरिकांच्यांही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया येत असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर भाजपची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. लैंगिक अत्याचारातील आरोपींशी भाजपला युती चालते का ? एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन, असे व्यभिचार घडवताय ? त्यांना पैसे देऊन अब्रू विकत घेताय का ? असा रोखठोक सवाल विचारत राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

लैंगिक अत्याचारातील या आरोपींना भाजपने बक्षीस दिलं का ?

देशभरातील अलीकडच्या काही घटना आपण पाहिल्या असतील. देशातील अनेक भागातील अशा प्रवृत्तीचे लोक जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, त्यांना आपल्या पक्षात घेऊन प्रतिष्ठा द्यायची हे भाजपचं राष्ट्रीय धोरण दिसत आहे. बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडल्यावर बदलापूरमधलं वातावरणम दोन दिवस पेटलं  होतं, आंदोलनही झालं. मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. ज्या शाळेमध्ये हा प्रकार झाला, त्या संबंधित मुली व आईची तक्रारही पोलीसांनी घेऊ नये यासाठी त्या शाळेच्या संचालकांनी भाजपच्या माध्यमातून दबाव आणला होता.

ज्या शाळेत जे घडलं त्या शाळेच्या संचालकांची काही जबाबदारी नाही का ? ते संचालक नंतर फरार झाले . नंतर सरंडर झाले. आम्हाला वाटलं की ते जेलमध्येच आहेत. पण आता कळतंय की ते नगरपालिकेच्या सभागृहात आहेत, रविंद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसवून घेऊन चाललेत असा टोला राऊत यांनी लगावला.

हे आपटे नावाचे जे गृहस्थ आहेत, आरएसएस आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपाने काय बक्षीस दिलं आहे का ? त्यांना काय इनाम दिलं आहे का ? पूर्वी इनाम द्यायचे. ते (आपटे) अजून निर्दोष सुटलेत का ? न्यायालयात खटला चालून ते निर्दोष सुटले असते तर आम्ही काही बोललो नसतो, पण अजून खटला  सुरू आहे. तो खटला चालवूही दिला जात नसल्याचा आरोप करत भविष्यात मुख्यमंत्री त्यांना क्लीन चीट देतील असंही राऊत म्हणाले.

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी तुमची युती होऊ शकते का ?

जर देवेंद्र फडणवीसांना काँग्रेससोबत युती नको आहे, तिथे त्यांनी कारवाई केली. ओवैसींच्या पक्षासोबत आमचे वैचारिक मतभेद आहेत, आम्ही त्यांच्यासोबत युती करणाऱ्यांवर कारवाई करू अस फडणवीस म्हणतात. मग लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी तुमची युती होऊ शकते का ? त्यांना थेट स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवत आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकताय. तुम्ही राज्याला, देशाला काय संदेश देत आहात ? तुम्ही महाराष्ट्राचे रक्षक, राज्यकर्ते आहात ना, हे तुमचं काम आहे का ?  असा सवाल राऊतांनी विचारला. हे अत्यंत घृणास्पद  काम भाजपने केल्याची टीकाही त्यांनी केली.