
Pimpri Chinchwad Municipal Election : राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका एकत्रच होणार आहेत. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होईल. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. पक्षांतराचे वारे नव्याने वाहू लागले आहे. राज्यातील अनेक माजी आमदार, माजी नगरसेवकांनी सोईच्या पक्षात प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून तर भाजपात जोरदार इन्कमिंग चालू झाली आहे. असे असतानाच आता ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या एका बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असून हा नेता आता भाजपात जाणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे यांच्या पक्षाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. येथील शिवसेनेचे (ठाकरे गट) शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. ऐन महापालिकेच्या निवडणुकीत वाघेरे यांनी हा निर्णय घेतला आहे. वाघेरे यांना भाजपात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत.
दुसरीकडे पिंपरी चिंचवड येथील पालिका निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरे गटाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. असे असतानाच या शहराचा शिलेदारच सोडून गेल्याने ठाकरेंची पंचाईत झाली आहे. वाघेरे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते काही पदाधिकारीदेखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येथे निवडणूक लढवायची असेल तर वाघेरे यांच्याच तोडीचा नेते आता ठाकरे यांना शोधावा लागणार आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे पिंपरी चिंचवड येथे अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच भाजपा यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे येथे हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. महायुतीच्या रुपात या दोन्ही पक्षांची युती असली तरी पुणे आणि पंपरी चिंचवड या दोन महापालिकांसाठी राष्ट्रवादी आणि भाजपात युती नसेल. त्यामुळे आता येथून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.