तो आडवा येत असेल तर… वाल्मिक अण्णाचा निरोप अन्…; संतोष देशमुख हत्याप्रकरणी तीन गुप्त साक्षीदारांचा जबाब
बीडच्या केज तालुक्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटी चौकशी करत आहेत. तीन गुप्त साक्षीदारांच्या जबाबातून वाल्मिक कराड यांच्या टोळीच्या क्रूरपणाचे आणि खंडणीच्या धंद्याचे भयानक चित्र उलगडले आहे.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. त्यांना मारहाण करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी तीन गुप्त साक्षीदारांचा जबाब समोर आला आहे. या जबाबातून अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी सध्या सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. त्यातच आता एसआयटीने तीन गुप्त साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे. यात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे.
साक्षीदार क्रमांक 1
विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला झापलं. तू स्वत:ची आणि आमचीही इज्जत घालवली. तुला प्लांट बंद करायला सांगितला होता. तू हात हलवत परत आला. सुदर्शन घुलेने सांगितलं की कंपनी बंद करणार होतो, पण संतोष देशमुख तिथे पोहोचला. मस्साजोगच्या लोकांनी आम्हाला हाकलून दिलं. यावर चाटेने सांगितलं की वाल्मिक अण्णा कराडचा निरोप आहे, संतोष देशमुख आडवा येत असेल तर कायमचा धडा शिकवा. यातून जो आमच्या मार्गात येईल, त्याचं काय होतं याचा सर्वांना संदेश जाईल, आपला धाक अजून वाढेल, असा जबाब पहिल्या साक्षीदाराने नोंदवला आहे.
साक्षीदार क्रमांक 2
मी सुदर्शन घुलेच्या गावचाच आहे. सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सुधीर सांगळे या तिघांची गावात मोठी दहशत होती. तिघेही वाल्मिक कराडच्याच आदेशावर खंडणी गोळी करायचे. सुधीर सांगळेचे हॉटेल आहे. तर सुदर्शन घुले मुकादमाचं काम करायचा, असा जबाब दुसऱ्या साक्षीदाराने नोंदवला आहे.
साक्षीदार क्रमांक 3
बीड जिल्ह्यात वर्चस्व राहावं म्हणून कराडने अनेक टोळ्या तयार केल्या. याद्वारे कंपन्यांकडून खंडणी मागितली जायची. खंडणी न देणाऱ्या कंपनी बंद पाडू म्हणून धमकावलं जायचं. या कामात जे अडथळा आणायचे त्यांना जबर मारहाण टोळीद्वारे व्हायची. कराडच्या या दहशतीमुळे कुणीही गुन्हा दाखल करायचं नाही. एखादा पोलीस ठाण्यात गेलाच तरी गुन्हा दाखल केला जात नव्हता, असे तिसऱ्या साक्षीदाराने पोलिसांना सांगितले.
