
Satara Phaltan Doctor Death News : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या आरोपींची चौकशी करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर कथितपणे पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांची नावे लिहिली होती. यातील बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा तसेच बनकर याने चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, आता याच प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. सोबतच या प्रकरणात राजकीय नेते मोठे दावे करताना पाहायला मिळत आहेत. आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पुढे येत मोठा आणि खळबळजनक असा दावा केला आहे. महिला डॉक्टरच्या तळहातावरील लिखाणात खाडाखोड होती. त्यामुळे तिचा खून झाला का? याची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संपूर्ण राज्यात साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे, आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी या महिला डॉक्टरच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. महिला डॉक्टरच्या तळहातावर सात ओळींचा एक संदेश होता. या संदेशातील हस्ताक्षरावरही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. तसेच त्या बीडच्या असल्याने त्यांना जाणून बुजून त्रास दिला जात होता. त्यांच्या हातावरील अक्षरात जरा शंका वाटते. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला याची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी भीमराव धोंडे यांनी केली आहे.
दरम्यान, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीदेखील या प्रकरणावर आपली भूमिका जाहीर केली आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या तळहातावरील अक्षर तिचे स्वत:चे नसल्याचे या डॉक्टरच्या बहिणीने मला सांगितले आहे, असे मुंडे यांनी सांगितले. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आगामी काळात नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.