बीडचं पार्सल बीडला पाठवा… सोलापुरात भाजप उमेदवार जोरदार ट्रोल; सोशल मीडियातून संताप

| Updated on: Mar 25, 2024 | 3:05 PM

भाजपने सोलापूरमधून आमदार राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. सोलापूर हा राखीव मतदारसंघ आहे. त्यामुळे या जिल्ह्यात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते हा सामना चांगलाच रंगणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राम सातपुते यांच्याविरोधात सोशल मीडियातून जोरदार प्रचार सुरू झाला आहे.

बीडचं पार्सल बीडला पाठवा... सोलापुरात भाजप उमेदवार जोरदार ट्रोल; सोशल मीडियातून संताप
राम सातपुते यांच्याविरोधात सोशल मीडियातून जोरदार प्रचार सुरू आहे.
Follow us on

भाजपने सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. राम सातपुते हे बाहेरच्या जिल्ह्याचे आहेत. असं असतानाही भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिकांकडून सातपुते यांना ट्रोल केलं जात आहे. बीडचं पार्सल बीडला पाठवा, असा मजकूर सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. सातपुतेंचं इथे काय काम? त्यांचा जिल्ह्याशी काय संबंध? अशी विचारणाही सोशल मीडियातून होत आहे. ट्रोल केलं गेल्याने सातपुते यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. अशा पद्धतीचं ट्रोलिंग म्हणजे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या साखर कारखान्यामध्ये माझ्या आई-वडिलांनी ऊस तोडीचे काम केलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या इटलीहून आल्या आहेत. त्या त्यांना चालल्या. मी चालत नाही का?, असा सवाल राम सातपुते यांनी केला आहे.

सोनिया गांधी, राहुल चालतात, मी का नाही?

काँग्रेस नेते राहुल गांधी पराभवाच्या भीतीने उत्तर प्रदेशातून वायनाडला गेले. तिथून ते निवडणूक लढतात ते त्यांना चालतात. पण मी सोलापूर जिल्ह्यातील आमदार असूनही त्यांना चालत नाही. मी तर याच राज्याचा आहे, असं सांगतानाच मोठ्या मताधिक्याने भाजप जिंकेल आणि सोलापूरमध्ये भाजप विजयाची हॅट्रिक करेल असा माझा विश्वास आहे, असंही सातपुते म्हणाले. तसेच गेल्या पाच वर्षांत माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे, त्याचं पद्धतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, असा टोला सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना लगावला आहे.

विश्वाससार्थ ठरवेन

मी 2019पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतोय. आमदार झाल्यापासून माझ्या परिने मी जनतेची सेवा केली आहे. जिल्ह्यातील विकास कामे केली आहे. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या ऊसतोड कामगाराच्या घरात जन्मलेल्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपने विश्वास दाखवला आहे. सोलापूरचा सर्वांगिण विकास करून हा विश्वास मी सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

हा सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान

भारतीय जनता पार्टीने मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी देऊन जो सन्मान केला त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला हा सन्मान आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासोबत महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो.