शरद पवार झेड प्लस सुरक्षा नाकारणार?; दिल्लीत काय घडतंय?

आता शरद पवारांकडून ही झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण...

शरद पवार झेड प्लस सुरक्षा नाकारणार?; दिल्लीत काय घडतंय?
| Updated on: Aug 30, 2024 | 2:20 PM

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असणार आहे. मात्र आता शरद पवारांकडून ही झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. मात्र ही सुरक्षा शरद पवारांकडून नाकारली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज शरद पवारांची दिल्लीत सुरक्षा यंत्रणांमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी मला मान्य नाहीत, असे पवारांनी यावेळी सांगितलं. त्यामुळेच आता शरद पवार केंद्र सरकार देत असलेली सुरक्षा नाकारणार असल्याचे बोललं जात आहे.

शरद पवारांनी व्यक्त केलेली शंका

शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा मिळाल्यानंतर त्यांनी याबद्दल शंका उपस्थित केली होती. गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की, देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे. मी विचारलं तीनमध्ये इतर दोन कोण आहेत? तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव सांगितले. मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. त्यामुळे सगळीकडे फिरावे लागते. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था केलेली असावी. नक्की काय हे सांगू शकत नाही. पण गृहविभागाचे संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार आहे.” असे शरद पवारांनी म्हटले होते.

Z Plus दर्जाची सुरक्षा म्हणजे काय?

दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अति-महत्वाच्या व्यक्तींना X, Y, Y Plus, Z, Z Plus दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येते. या सुरक्षा यंत्रणेत मनुष्य बळ आणि वाहनांच्या ताफा यात काही मुलभूत फरक असतो. या व्यतिरिक्त आणखी एक एसपीजी सुरक्षा पुरविली जाते. ही सुरक्षा केवळ देशांच्या पंतप्रधानांना पुरविली जाते. त्यानंतर झेड प्लस दर्जाच्या सुरक्षा श्रेणीचा क्रमांक लागतो. प्रत्येक दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेतील ताफ्यात असणाऱ्या जवांनाची संख्या वेगवेगळी असते.

झेड प्लस सिक्युरिटीत अनेक जवान सुरक्षा पुरवत असतात. यात एकूण 36 जवानांचा ताफा असतो. यात काही जवान एनएसजी तर काही जवान सीआरपीएफ, सीआयएसएफ असतात. झेड प्लस सुरक्षेत काही राज्य पोलिस दलातील जवान देखील सामील असतात. जेझ प्लसनंतर झेड, वाय प्लस, वाय, एक्स इत्यादी श्रेणींचा समावेश असतो.