
Sharad Pawar On Hindi : राज्य सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याच्या धोरणाचा विरोधकांकडून टोकाचा विरोध केला जात आहे. काहीही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती लागू होऊ देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. यामध्ये मनसेचे नेते राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.येत्या 6 जुलै रोजी मनसे पक्षातर्फे हिंदीविरोधी मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता या मोर्चात कोण-कोण सहभागी होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावरच खासदार शरद पवार यांनी भाष्य केलंय. त्यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवला जाण्याच्या धोरणाचा विरोध केला आहे.
माझ्यामते प्राथमिक शिक्षणात हिंदीच सक्ती नसायला हवी. असाच सगळ्यांचा आग्रह आहे. इयत्ता 5 वीनंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही. लहान मुलांवर भाषेचा लोड किती द्यायचा, याचा विचार करावा लागेल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
तसेच, मातृभाषा मागे पडली तर ते योग्य नाही. सरकारने हट्ट सोडावा. मातृभाषा हीच महत्त्वाची असायला हवी. इयत्ता 5 वीनंतर काय शिकायचं हे कुटुंबातील लोक निर्णय घेतील, असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदीला कडाडून विरोध केला आहे. येत्या 6 जुलै रोजी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असेल.यात अनेक कलाकारही असणार आहेत.
दरम्यान, यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट पाहिलं आहे. ते काहीही चुकीचं बोलले नाहीत. कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नकोय हे त्यांमनी सांगितलं. मोर्चाबाबत मला अजून कोणी सांगितलेलं नाही. हिंदी सक्तीचा विषय कुणी एक पक्ष हाती घेऊ शकत नाही. आम्ही अन्य पक्षांशी बोलणार आहोत.आमचा विचार निगेटिव्ह नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
त्यामुळे आता येत्या 6 जुलैच्या मोर्चाला शरद पवार उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.