Rohit Pawar : ..तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी आमचा पाठिंबा, रोहित पवार यांचं विधान
Rohit Pawar : "रोहित पवार यांनी आज लालसगाव मध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. कांद्याला जाहीर केलेला भाव योग्य नाही, तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही. भविष्यात हेच भाव राहिले तर आत्महत्या करावी लागेल असे शेतकऱ्यांचे मत आहे. कांद्याला 12 रुपये जाहीर केलेला भाव योग्य नाही. नाफेडने कांदा खरेदी बाजार समितीत खरेदी करावा" अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

“नितेश राणे बिळाच्या बाहेर ये. शेतकरी हिंदू नाहीत का ?. शिवाजी महाराज, महात्मा फुले आदींचे अपमान होतात, त्यावेळी कुठे बिळात लपतोस?. तुमची उंची आम्हाला कळली. वरिष्ठांकडून आदेश आल्यावर नाचायला लागतात. भूमिका, विचार, कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात” अशा शब्दात रोहित पवार यांनी नितेश राणेंना आव्हान दिलं. “आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. तुम्ही पण शेतकऱ्यांसाठी लढा. नेत्यांना खुश करण्यासाठी हे आमदार बोलताहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला एकनाथ शिंदे यांनी योग्य भाव दिला, तर आम्हीही त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देऊ” असं रोहित पवार म्हणाले. “ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांची मुले पुढे जातात आणि गरिबांची पोरं मागे राहतात. पेपर फुटी प्रकरण मागे देखील झाले होते. पेपर फुटल्याने तिघांनी आत्महत्या केली” याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं.
“एक दोन व्यक्ती टार्गेट केले गेले. खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. त्याला पोलिसात मारले जाऊ शकते. महिलांवर अन्याय केले ते चुकीचेच,कारवाई झाली पाहिजे. काळी बाहुली, रक्त हे कोणासाठी केले होते? आमचा त्यावर विश्वास नाही, पण त्याचा शोध घेतला पाहिजे. खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. सामन्यांचे व्हिडिओ बाहेर आणले, मोठ्यांचे व्हिडिओ कपाटात ठेवले” अशी टीका रोहित पवार यांनी केली.
मग आकडा पार पंतप्रधान साहेबांपासून निघेल
“पक्षाचा नेता असल्याने राज्यात विविध दौरे करावे लागतात. त्यांचे इतर आमदार होते ना विषय मांडायला. मग काढायचे असेल तर सर्वांचेच काढा. दिल्लीत आणि येथे पण. मग आकडा पार पंतप्रधान साहेबांपासून निघेल” असं रोहित पवार उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळातील उपस्थितीवर म्हणाले.
नाफेड भ्रष्टाचारात सत्तेतील नेते
“नाफेड भ्रष्टाचारात सत्तेतील नेते अडकले आहेत. त्याची चौकशी कशी होणार?. भोंदू खरात कांदा खरेदी करतोय, कारण तो नेत्यांच्या जवळ आहे. तो पूजा पाठ सोडून कांदे खरेदी करतोय, जमिनी खरेदी करतोय. नाफेड भ्रष्टाचारामध्ये सत्तेतील नेते सामील” असा आरोप रोहित पवार यांनी नाफेड खरेदी भ्रष्टाचारावर केला.
कांद्याच्या भावासाठी ते लढले असते
“शेतकऱ्यांसाठी दादा अग्रेसर होते. कांद्याच्या भावासाठी ते लढले असते. त्यांचा वेगळा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाबद्दल मी यापुढे जास्त बोलणार नाही” असं रोहित पवार यांनी सांगितलं.