शरद पवारांना फडणवीसांचा फोन, उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? नेमकं काय ठरलं?

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला होता, नेमकं काय बोलणं झालं? याबाबत आता शरद पवार यांनी माहिती दिली आहे.

शरद पवारांना फडणवीसांचा फोन, उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? नेमकं काय ठरलं?
| Updated on: Aug 22, 2025 | 3:13 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उपराष्ट्रपतीपदासाठी  एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांकडूनही उमेदवार देण्यात आले आहेत. एनडीएकडून सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.

विरोधकांनी देखील या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील फोन केला होता. या फोनबाबत पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले पवार?  

काल मला मुख्यमंत्र्यांनी कॉल केला होता.  देवेंद्र फडणवीस यांनी मला विनंती केली की राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा. मी त्यांना सांगितलं की ते आमच्या विचाराचे नाहीत. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही. आम्ही आमचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  सी. पी. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असताना झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली होती, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, उपराष्ट्रपतीपदासाठी आमच्याकडे मतं कमी आहेत, मात्र आम्हाला त्याची चिंता नाही, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी बिहार निवडणुकीबाबत देखील भाष्य केलं आहे. सध्या राहुल गांधींकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप होत  आहेत, तसेच त्यांनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा देखील सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहार राजकीय दृष्टीने जागृत राज्य आहे, बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक आयोग त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत नाही, मतदार यादीबाबत आमचा अभ्यास सुरू आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.