
राज्यात पावसाने थैमान घातले असून अनेक भागात पूर आला. अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यावरील संकट अजूनही टळले नाहीये. कमी दाबाचा पट्टा अजूनही आहे. आज देखील अनेक भागात भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलाय. लोकांची शेती, घरे पाण्याखाली आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. सरकारने मदत देखील जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत खालची यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे की, नाही यावर लक्ष ठेऊन बाहेर जाऊन काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाकडून लोकांना मदत पोहोचवण्याचे काम देखील सुरू आहे.
यादरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या लोकांच्या मदतीला पोहोचल्या. लोकांना वाटण्यासाठी 200 किट घेऊन त्या सोलापूरमध्ये पोहोचल्या. यादरम्यान लोकांनी आम्हाला जेवणाच्या पूर्ण किट भेटल्या नसल्याचे सांगितल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी थेट सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी हा फोन जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेला. फोन स्पीकरवर ठेऊन त्या लोकांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना बोलत होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारे यांनाच झापले. सध्या काय महत्वाचे आहे हे सांगून तुम्ही देखील लोकांना मदत करा. 3 हजार लोक असताना तुम्ही 200 किट घेऊन पोहोचल्या असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसलाय. आता यावर ज्योती वाघमारे यांनी थेट भाष्य केले. त्यांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे.
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, मी जिल्हाधिकाऱ्यांना दोन नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी, टेंडरसाठी किंवा बेकायदेशीर कामासाठी कॉल केलेला नव्हता. जर पूरग्रस्त गावात प्रशासनाचे जेवण पोहोचत नसल्याचे प्रशासनाला सांगितले तर तो माझा गुन्हा आहे का? गोरगरिबांचा आवाज बनणं गुन्हा असेल तर तो मी हजार वेळा करेल. गावात मदत पोहोचत नसल्याने मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता.
त्यात मी त्यांना एकेरी भाषा वापरलेली आहे का? कोण्या नेत्याच्या नावाने धमक्या दिल्यात का? त्यांना शिवीगाळ केलीय का? मदत पोहोचली नाही हे सांगितल्यानंतर तुम्ही किती मदत दिली असं विचारून राजकारण कोण करतय हे जनतेने सांगावं. ज्यांच्या पायाला चिखल देखील लागला नाही ते लोक मला ट्रोल करत आहेत. मात्र, मी त्यांना भीक घालत नाही, असे स्पष्टपणे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी म्हटले आहे.