‘संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं परंतु…’, शहाजी बापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. शहाजी बापू पाटील यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती, अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत, उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं. शिवसेनेत दोन गट पडले, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट.
दरम्यान या घटनेच्या तीन वर्षांनंतर आता शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांना गुवाहाटीला यायचे होते, परंतु आमदारांचा विरोध होता, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. तीन वर्षानंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे, या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शहाजी बापू पाटील?
गुवाहाटी येथील बंडामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांनी राऊत यांना विरोध केला. म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य आहे, लवकरच राजकीय घडामोडी घडतील असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ठाकरे गट एकत्रीकरणाचा विषय पुढे येतोय. पण काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव साहेब यांच्या सोबत राज ठाकरे जर गेले, तर राज साहेबांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येणार असं भाकीत देखील त्यांनी यावेळी वर्तवलं आहे.