
निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदेसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मत मोजणी होणार आहे. दरम्यान अद्याप महापालिकेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक होताच राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा देखील होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. राज्यातली राजकीय परिस्थिती पहाता महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे, मुंबई महापालिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना मुंबई महापालिकेसाठी आमची शंभर जागा लढवण्याची तयारी आहे, असं मोठं वक्तव्य देखील सुर्वे यांनी यावेळी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले सुर्वे?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमची 100 जागा लढवण्याची तयारी आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात सात जागा आहेत, आणि या सातही जागा आम्ही मागणार. आम्ही या सर्व जागा जिंकणार असा आमचा विश्वास आहे. महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसणार. आता 100 नगरसेवक आमच्याकडे आहेत आणि म्हणून 100 सीटची आम्हाला अपेक्षा असणार आहे, असं यावेळी सुर्वे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधी असताना ज्या लोकांच्या एका पत्रावर सही केली नाही, गोरगरिबांना मदत केली नाही, हे सगळे जनता विसरलेली नाही. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर जनतेचं प्रेम आहे, असं यावेळी सुर्वे यांनी म्हटलं आहे.