मुंबई महापालीकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट इतक्या जागा मागण्याची शक्यता, मोठी बातमी समोर
राज्यात नगर पंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीनंतर लवकरच महापालिकेची देखील निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मतमोजणी आहे. दरम्यान जरी राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप महापालिकांच्या निवडणुका बाकी आहेत, महापालिकांच्या निवडणुकांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होताच राज्यात महापालिका निवडणुका देखील होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे महायुती म्हणून लढवणार का याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, अखेर याचं उत्तर आता समोर आलं आहे, काही ठिकाणी या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जाणार आहेत, तर काही ठिकणी स्वबळावर निवडणुका लढवण्यात येणार आहेत, दरम्यान यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबतची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं होतं की, जिथे -जिथे महाविकास आघाडीला फायदा होणार असं वाटत आहे, तिथे आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत. त्यामुळे आता मुंबई महापालिका देखील महायुती म्हणून लढवली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान जर मुंबई महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली गेली तर कोणाच्या वाट्याला किती जागा येणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत 125 जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. 2012 आणि 2017 मिळून 125 नगरसेवक सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे, त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून 125 जागांची मागणी करण्यात येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
