ईव्हीएम मशीन हवेत चार्ज होते काय? एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढलेल्या नेत्याचा ईव्हीएमच्या चार्जिंगवरून हल्ला

ईव्हीएमच्या मुद्द्यावर सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवारानं आता याच मुद्द्यावर बोलताना जोरदार हल्लाबोल केला आहे.

ईव्हीएम मशीन हवेत चार्ज होते काय? एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढलेल्या नेत्याचा ईव्हीएमच्या चार्जिंगवरून हल्ला
evm machine
| Updated on: Nov 30, 2024 | 2:27 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारल्याचं पहायला मिळालं. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. तीन प्रमुख घटक पक्ष मिळून महाविकास आघाडीला केवळ 50 जागाच जिंकता आल्या मात्र दुसरीकडे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं. महायुतीने राज्यात तब्बल 230 जागा जिंकल्या. 132 जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाला 57 तर अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या.

दरम्यान या परभावानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून, पुढच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी भूमिका घेण्यात आली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढलेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांनी देखील ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाले दिघे? 

विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व गोष्ट एकतर्फी झाल्या, आम्ही जेव्हा प्रचार करायचो तेव्हा आम्हाला वेळेची मर्यादा होती. मात्र विरोधकांवर कोणतीही कारवाई झाली नाही.  बॅलेट पेपर जेव्हा आणले होते तेव्हा ते सील असायला हवे होते, परंतु ते अनसिल्ड एनव्हलप होते. स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्याऐवजी ते ऑब्झर्वेशन रूममध्ये ठेवण्यात आले होते. शेवटच्या तासांमध्ये जवळपास 76 लाख मतदान वाढले, एवढं मतदान नेमकं कसं आणि कुठूनं वाढलं? असे अनेक प्रश्न आहेत.

पुढे बोलताना केदार दिघे यांनी म्हटलं की, सकाळी जेव्हा मशीन चालू होते, तेव्हा शंभर टक्के चार्ज आहे अशी दिसते. संध्याकाळपर्यंत ती वापरली जाते जवळपास 60 ते 70 टक्के बॅटरी राहते, 30 टक्के बॅटरी कंजर्वेशन त्यावेळेला होतं. ज्या वेळेला काउंटिंगचा दिवस येतो त्यावेळेला ही बॅटरी पुन्हा 99 टक्के चार्ज कशी दाखवते? स्ट्रँग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएमची बॅटरी हवेत तर चार्ज होत नाही.  तिला चार्ज करावे लागते किंवा बॅटरी रिप्लेस करावी लागते. याचं देखील उत्तर त्यांच्याकडे नाही, असा हल्लाबोल यावेळी दिघे यांनी केला आहे.